उत्पत्ती 9
9
देवाचा नोहाशी करार
1मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.
2पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रांगणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्व मासे ह्यांना तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या स्वाधीन केले आहेत.
3सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील; वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हांला दिली होती त्याप्रमाणे सर्वकाही आता तुम्हांला देतो.
4तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका.
5मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन; प्रत्येक पशूची व मनुष्याची झडती घेईन; प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जिवाबद्दल झडती घेईन.
6जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे.
7तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा.”
8देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणाला, 9“पाहा, मी तुमच्याशी व तुमच्यामागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो;
10त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशू व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशीही मी करार करून ठेवतो.
11तुमच्याशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणिमात्र नष्ट होणार नाहीत, आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही.”
12देव म्हणाला, “माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये, त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असणार्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या, युगानुयुग राहणारा जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे :
13मी मेघांत धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल.
14मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यांत धनुष्य दिसेल,
15तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी ह्यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि ह्यापुढे सर्व देहधार्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही.
16धनुष्य मेघांत दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानुयुग राहणार्या कराराचे मला स्मरण होईल.”
17देव नोहाला म्हणाला, “माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी ह्यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होय.”
नोहा आणि त्याचे मुलगे
18नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; हाम हा कनानाचा बाप.
19हे नोहाचे तीन मुलगे; ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला.
20नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला;
21तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्यात उघडानागडा पडला.
22तेव्हा कनानाचा बाप हाम ह्याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले.
23तेव्हा शेम व याफेथ ह्यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यांवर ठेवले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली; त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यांना आपल्या बापाची नग्नता दिसली नाही.
24द्राक्षारसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले.
25तो म्हणाला,
“कनान शापित होईल,
तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल.”
26तो म्हणाला,
“शेमाचा देव परमेश्वर धन्य! कनान त्याचा दास होईल.
27देव याफेथाचा विस्तार करील;
तो शेमाच्या डेर्यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.”
28नोहा जलप्रलयानंतर तीनशे पन्नास वर्षे जगला.
29नोहा एकंदर नऊशे पन्नास वर्षे जगला, मग तो मरण पावला.
Nu markerat:
उत्पत्ती 9: MARVBSI
Märk
Dela
Kopiera

Vill du ha dina höjdpunkter sparade på alla dina enheter? Registrera dig eller logga in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.