YouVersion logo
Dugme za pretraživanje

उत्पत्ती 17

17
सुंतेचा करार
1अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ#17:1 सर्वसमर्थ मूळ भाषेत एल-शद्दाय परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा. 2मग मी माझ्या व तुझ्यामध्ये एक करार करेन आणि तुला बहुगुणित करेन.”
3अब्रामाने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला आणि परमेश्वर त्याला म्हणाले, 4“मी तुझ्याशी हा करार करतो: तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. 5आता येथून पुढे तुझे नाव अब्राम#17:5 अब्राम अर्थात् उदात्त पिता असे राहणार नाही, तर ते अब्राहाम#17:5 अब्राहाम अर्थात् अनेक राष्ट्रांचा पिता असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे. 6मी तुला फलद्रूप करेन; मी तुझ्यापासून राष्ट्रे उदयास आणेल आणि तुझ्या संततीमधून राजे उत्पन्न होतील. 7तुझ्या व तुझ्या येणार्‍या पिढीबरोबर मी असा शाश्वत करार स्थापित करेन की, तुझा व तुझ्यानंतर तुझ्या संतानांचा मी परमेश्वर होईन. 8ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.”
9मग परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “माझ्याशी केलेल्या कराराचे तू आणि तुझ्या येणार्‍या वंशजांनी पिढ्यान् पिढ्या पर्यंत पालन करावे. 10तू आणि तुझ्या वंशजांशी हा माझा करार म्हणजे: तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची तुम्ही सुंता केली पाहिजे. 11ही सुंता, तुझ्या आणि माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह होईल. 12पुत्र जन्मल्यानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. सुंतेची ही अट तू पैसे देऊन विकत घेतलेल्या परदेशीय गुलामांना आणि तुझ्या घराण्यात जन्मलेल्या प्रत्येकाला, जी तुझी संतती नाही त्यांनाही लागू आहे. 13तुझ्या घराण्यात जन्मलेल्या किंवा तू पैसे देऊन विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता केली जावो. तुझ्या शरीराशी केलेला हा करार सदासर्वकाळचा आहे. 14सुंता न केलेल्या प्रत्येक पुरुषाला त्या समाजातून बेदखल करण्यात येईल कारण त्याने माझा करार मोडला आहे.”
15मग परमेश्वराने अब्राहामालाही म्हटले, “तुझी पत्नी साराय हिचे नाव आता साराय राहणार नाही, तर तिचे नाव साराह#17:15 साराह म्हणजे राजकन्या असे होईल. 16मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून तुला निश्चितच एक पुत्र देईन. मी तिला आशीर्वादित करेन आणि तिला अनेक राष्ट्रांची माता करेन; तिच्यातून लोकांचे राजे उत्पन्न होतील.”
17अब्राहामाने लवून नमस्कार केला; आणि तो हसला व स्वतःशी म्हणाला, “शंभर वर्षांच्या माणसालाही मुले होतील का? नव्वद वर्षांच्या साराहच्या पोटी बाळ जन्माला येऊ शकेल काय?” 18तेव्हा अब्राहामाने परमेश्वराला म्हटले, “केवळ इश्माएल तुमच्या आशीर्वादाखाली राहिला तरी पुरे!”
19परमेश्वराने उत्तर दिले, “होय, परंतु तुझी पत्नी साराह हिच्यापासून तुला एक पुत्र होईल आणि तू त्याचे नाव इसहाक#17:19 इसहाक म्हणजे तो हसतो असे ठेवावेस. मी त्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशजांबरोबरही अनंतकाळचा करार स्थापित करेन. 20इश्माएलाविषयी मी तुझी विनंती ऐकली आहे: मी त्याला निश्चितच आशीर्वाद देईन; त्याला फलद्रूप करेन व बहुगुणित करेन. तो बारा शासकांचा पिता होईल व मी त्याला एक महान राष्ट्र बनवेन. 21पण माझा करार मी इसहाकाबरोबर स्थापित करेन. ज्याला पुढील वर्षी याच सुमारास साराह तुझ्यासाठी प्रसवेल.” 22जेव्हा त्याने अब्राहामाशी बोलणे संपविले तेव्हा परमेश्वर अंतर्धान पावले.
23त्याच दिवशी अब्राहामाने आपला पुत्र इश्माएल आणि आपल्या घरात जन्मलेले किंवा पैसे देऊन विकत घेतलेले सर्व पुरुष यांची परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सुंता केली. 24अब्राहामाची सुंता झाली त्यावेळी तो नव्याण्णव वर्षांचा होता, 25आणि त्याचा पुत्र इश्माएल तेरा वर्षांचा होता जेव्हा त्याची सुंता झाली. 26अब्राहाम व त्याचा पुत्र इश्माएल या दोघांचीही सुंता एकाच दिवशी झाली. 27अब्राहामाच्या घरातील सर्व पुरुष, त्याच्या घरात जन्मलेले व पैसे देऊन परदेशी व्यक्तीकडून खरेदी केली गुलाम यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली.

Istaknuto

Podijeli

Kopiraj

None

Želiš li da tvoje istaknuto bude sačuvano na svim tvojim uređajima? Kreiraj nalog ili se prijavi