उत्पत्ती 16

16
हागार आणि इश्माएल
1अब्रामाला साराय आपली पत्नी हिच्यापासून मूलबाळ नव्हते. पण सारायला हागार नावाची इजिप्तची एक दासी होती; 2सारायने अब्रामाला म्हटले, “याहवेहने मला मूलबाळ दिले नाही, म्हणून तू माझ्या दासीचा स्वीकार कर; म्हणजे तिच्यापासून माझी मुले होतील.”
आणि अब्रामाने तिचा शब्द मानला. 3अब्राम कनान देशात राहून दहा वर्षे झाली होती. अब्रामाची पत्नी साराय हिने आपली इजिप्तची दासी हागार हिला अब्रामाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे सोपविले. 4तो हागारसोबत निजला आणि ती गर्भवती झाली.
जेव्हा तिला आपण गर्भवती झाल्याचे लक्षात आले, तेव्हा ती तिच्या मालकिणीचा तिरस्कार करू लागली. 5मग साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्याशी होत असलेल्या अन्यायास तुम्ही जबाबदार आहात. वास्तविक, मी तिला तुमच्या हातात दिले आणि आता जेव्हा तिला कळले की ती गर्भवती आहे, ती मला तुच्छ मानू लागली आहे. याहवेह माझ्या व तुमच्यामध्ये न्याय करो.”
6यावर अब्रामाने सारायला उत्तर दिले, “तुझ्या दासीवर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुला जे योग्य वाटेल ते तिच्याशी कर.” तेव्हा सारायने हागारची छळणूक केली; आणि हागार तिच्यापासून पळून गेली.
7शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्‍याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली. 8तो तिला म्हणाला, “अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?”
हागारेने उत्तर दिले, “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.”
9तेव्हा याहवेहचा दूत तिला म्हणाला, “तू तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधीनतेत राहा.” 10दूत पुढे म्हणाला, “मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही.”
11याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले,
“आता तू गर्भवती आहेस
आणि तुला एक पुत्र होईल.
तू त्याचे नाव इश्माएल#16:11 इश्माएल अर्थात् परमेश्वर ऐकतात असे ठेव,
कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे.
12तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल;
त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल
व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल;
आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये
शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील.”
13तिच्याशी बोलणार्‍या याहवेहला तिने हे नाव दिले: “मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात,” कारण ती म्हणाली, “जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे.” 14म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई#16:14 बएर-लहाई-रोई अर्थात् मला पाहणार्‍या जिवंत परमेश्वराची विहीर असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
15मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले. 16हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला त्यावेळी अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.

Označeno

Deli

Kopiraj

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in