निर्गम 6

6
1तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”
2परमेश्वर मोशेला म्हणाले, मी याहवेह आहे. 3मी सर्वसमर्थ परमेश्वर#6:3 मूळ भाषेत एल-शद्दाय म्हणून अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रकट झालो होतो, परंतु माझ्या याहवेह या नावाने मी स्वतःची त्यांना ओळख करून दिली नव्हती. 4ज्या कनान देशात ते पूर्वी परदेशी म्हणून राहत होते, तो देश मी त्यांना देईन, असा मी त्यांच्याशी करार स्थापित केला. 5आता इस्राएली लोकांचे इजिप्तच्या दास्यातील विव्हळणे मी ऐकले आणि माझ्या कराराची मला आठवण झाली आहे.
6म्हणून इस्राएली लोकांना सांग, “मी याहवेह आहे आणि मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या ओझ्याखालून बाहेर आणेन, त्यांच्या कष्टप्रद गुलामगिरीतून मी तुम्हाला मुक्त करेन आणि माझ्या लांब केलेल्या बाहूने व न्यायाच्या महान कृत्यांनी तुमची सुटका करेन. 7मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारेन आणि मी तुमचा परमेश्वर होईन, मग तुम्हाला कळून येईल की, तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून सोडविणारा परमेश्वर याहवेह मीच आहे. 8आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.”
9तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, परंतु त्यांची निराशा व कठोर परिश्रम यामुळे त्यांनी त्याचे ऐकले नाही.
10तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, 11“जा, इजिप्तचा राजा फारोह याला सांग की, इस्राएल लोकांस त्याच्या देशातून त्याने जाऊ द्यावे.”
12परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “मी बोबड्या ओठांचा आहे म्हणून जर इस्राएल लोकच माझे ऐकत नाहीत, तर फारोह माझे का ऐकेल?”
मोशे आणि अहरोन यांची वंशावळ
13आता याहवेह मोशे व अहरोनाशी इस्राएली लोक व इजिप्तचा राजा फारोह याविषयी बोलले आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे याविषयी आज्ञा केली.
14त्यांच्या कुटुंब प्रमुखांची नावे ही:
इस्राएलाचा प्रथमपुत्र रऊबेन याचे पुत्र:
हनोख व पल्लू, हेस्रोन व कर्मी.
हे रऊबेनाचे कूळ.
15शिमओनाचे पुत्र हे:
यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीचा पुत्र शौल.
हे शिमओनाचे कूळ होते.
16लेवीच्या पुत्रांची ही क्रमानुसार नावे:
गेर्षोन, कोहाथ व मरारी.
(लेवी एकशे सदतीस वर्षे जगला.)
17गेर्षोनाच्या पुत्रांची त्यांच्या कुळांनुसार नावे ही:
लिब्नी व शिमी.
18कोहाथाच्या पुत्रांची नावे:
अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
(कोहाथ एकशे तेहतीस वर्षे जगला.)
19मरारीच्या पुत्रांची नावे:
महली व मूशी.
आपआपल्या वंशावळ्याप्रमाणे ही लेवीची कुळे.
20अम्रामाने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याबरोबर विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे हे झाले.
(अम्राम हा एकशे सदतीस वर्षे जगला.)
21इसहाराच्या पुत्रांची नावे:
कोरह, नेफेग व जिक्री.
22उज्जीएलाच्या पुत्रांची नावे:
मिशाएल, एलसाफान व सिथ्री.
23अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.
24कोरहाच्या पुत्रांची नावे:
अस्सीर, एलकानाह व अबीयासाफ.
ही कोरही कुळे होती.
25अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला.
हे आपआपल्या कुळाप्रमाणे लेवी वंशातील प्रमुख होते.
26ज्या अहरोन व मोशे यांना याहवेहने सांगितले होते, “इजिप्तच्या भूमीतून सर्व इस्राएलच्या लोकांना त्यांच्या तुकडीनुसार बाहेर आणा.” 27हे तेच मोशे व अहरोन आहेत जे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासंबंधी इजिप्तचा राजा फारोहबरोबर बोलले.
अहरोन मोशेच्या वतीने बोलतो
28जेव्हा मोशे इजिप्तमध्ये होता तेव्हा याहवेह त्याच्याशी बोलले, 29याहवेह मोशेला म्हणाले, “मी याहवेह आहे. जा व मी तुला जे काही सांगतो ते इजिप्तचा राजा फारोह याला सांग.”
30परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “कारण मी बोबड्या ओठांचा आहे, फारोह माझे कसे ऐकणार?”

Currently Selected:

निर्गम 6: MRCV

Označeno

Deli

Kopiraj

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in