निर्गम 1

1
इस्राएलाचा छळ
1याकोबाबरोबर इजिप्तला गेलेल्या इस्राएलचे पुत्र, जे आपल्या कुटुंबासह गेले, त्यांची नावे ही आहेत:
2रऊबेन, शिमओन, लेवी आणि यहूदाह;
3इस्साखार, जबुलून आणि बिन्यामीन;
4दान आणि नफताली;
गाद व आशेर.
5याकोबाचे एकूण सत्तर वंशज होते; योसेफ तर आधीच इजिप्तमध्ये गेला होता.
6आता योसेफ आणि त्याचे सर्व भाऊ व ती सर्व पिढी मरण पावली. 7परंतु इस्राएली लोक अत्यंत फलद्रूप झाले; ते बहुगुणित होऊन त्यांना पुष्कळ संतती झाली आणि त्यांची संख्या वाढून, लवकरच ते इतके असंख्य झाले की संपूर्ण देश त्यांनी व्यापून टाकला.
8नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता. 9त्याने आपल्या लोकांना सांगितले, “पाहा, इस्राएली लोक संख्येने आपल्यापेक्षा जास्त आहेत. 10चला त्यांच्याशी चातुर्याने वागू या, नाहीतर त्यांची संख्या अजून वाढेल, आणि लढाई झाली तर ते आपल्या शत्रूंशी एक होतील आणि देश सोडून जातील.”
11म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली. 12परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले. 13इजिप्तचे लोक इस्राएली लोकांकडून कठोरपणे कष्ट करून घेऊ लागले. 14विटा व चुन्यातील कष्टाच्या कामाने त्यांचे जीवन कठीण केले आणि शेतातील प्रत्येक प्रकारच्या कष्टाच्या कामात त्यांच्याशी इजिप्तचे लोक कठोरतेने वागले.
15इजिप्तच्या राजाने शिफ्राह व पुआह नावाच्या दोन इब्री सुइणींना अशी सूचना दिली की, 16“इब्री स्त्रियांची प्रसूतीच्या तिवईवर मदत करीत असताना जर मुलगा जन्मला तर त्याला मारून टाका, परंतु मुलगी असली तर तिला जगू द्या.” 17पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले. 18तेव्हा इजिप्तच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही मुलांना का जिवंत राहू दिले?”
19सुइणींनी फारोह राजाला उत्तर दिले, “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांप्रमाणे नाहीत; त्या सशक्त आहेत आणि आम्ही तिथे पोहचण्या आधीच बाळंत होतात.”
20म्हणून परमेश्वराने त्या सुइणींना आशीर्वाद दिला आणि इस्राएली लोक बहुगुणित झाले व संख्येने फार अधिक झाले. 21या सुइणींनी परमेश्वराचे भय धरल्यामुळे परमेश्वराने त्यांची कुटुंबे स्थापित केली.
22मग फारोहने आपल्या सर्व लोकांना हुकूम दिला, “इब्य्रांना होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्यावा, परंतु प्रत्येक मुलीला जिवंत राहू द्यावे.”

Currently Selected:

निर्गम 1: MRCV

Označeno

Deli

Kopiraj

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in