Logo YouVersion
Ikona Hľadať

योहान 7

7
येशू आणि त्याचे भाऊ
1त्यानंतर येशू गालीलमध्ये फिरू लागला, यहुदी त्याला ठार मारायला पाहत होते म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. 2यहुदी लोकांचा मंडपांचा सण जवळ आला होता, 3तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “तू जे कार्य करतोस, ते तुझ्या शिष्यांनीही पाहावे म्हणून तू येथून निघून यहुदियात जा. 4जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो, तो गुप्तपणे काही करत नाही. तू हे कार्य करत आहेस, हे जगाला दाखव.” 5त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.
6येशू त्यांना म्हणाला, “माझी उचित वेळ अजून आली नाही, तुमची वेळ तर नेहमीच उचित असते. 7जग तुमचा द्वेष करू शकत नाही, पण ते माझा द्वेष करते कारण त्याची कृत्ये वाईट आहेत, अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो. 8तुम्ही सणाला जा, मी ह्या सणाला जाणार नाही. कारण माझी उचित वेळ अजून आली नाही.” 9असे त्यांना सांगून तो गालीलमध्ये राहिला.
10परंतु त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही तेथे गेला, मात्र उघडपणे नव्हे तर गुप्तपणे गेला. 11यहुदी त्या सणात त्याचा शोध घेत होते व म्हणत होते, “तो कुठे आहे?”
12लोकसमुदायात त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहे”, इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहे.” 13परंतु यहुद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नव्हते.
मी देवाकडून आलो आहे - येशू
14सणाचे सुमारे अर्धे दिवस संपल्यावर येशू मंदिरात जाऊन शिकवण देऊ लागला. 15ह्यावरून यहुदी लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, “शिक्षण झाले नसताना ह्याला एवढे ज्ञान कसे मिळाले?”
16त्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे. 17जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करायची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवाकडून आहे किंवा मी माझ्या स्वतःचे बोलतो, हे समजेल. 18जो आपल्या स्वतःचे बोलतो तो स्वतःचा गौरव करू पाहतो. परंतु आपल्याला ज्याने पाठवले त्याचा गौरव जो करू पाहतो, तो प्रामाणिक आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही. 19मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?”
20लोकसमुदायाने उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”
21येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्यचकित झाला आहात. 22मोशेने तुम्हांला सुंता करण्याचा आदेश दिला (जरी ती मोशेपासून नव्हे, तर पूर्वजांपासून सुरू झाली) व तुम्ही साबाथ दिवशी माणसाची सुंता करता. 23मोशेचा नियम मोडला जाऊ नये ह्याकरता मनुष्याची सुंता जर साबाथ दिवशीदेखील केली जाते, तर मी साबाथ दिवशी एका मनुष्याला पूर्णपणे बरे केले म्हणून तुम्ही माझ्यावर रागावता काय? 24बाह्यरूप पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”
25हे ऐकून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, “ज्याला ते ठार मारायला पाहतात तो हाच ना? 26पाहा, तो उघडपणे बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? 27हा कुठला आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला असेल हे कोणालाही माहीत असणार नाही.”
28नंतर मंदिरात शिकवण देत असता येशूने आवर्जून म्हटले, “तुम्ही मला ओळखता व मी कुठला आहे, हेही तुम्हांला ठाऊक आहे. तथापि मी आपण होऊन आलो नाही, पण ज्याने मला पाठवले तो सत्यस्वरूपी आहे आणि त्याला तुम्ही ओळखत नाही. 29मी मात्र त्याला ओळखतो कारण मी त्याच्याकडून आलो आहे व त्याने मला पाठवले आहे.”
30ह्यामुळे ते त्याला धरायला पाहत होते, तरी पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. 31मात्र लोकसमुदायातील बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणाले, “ख्रिस्त येईल तेव्हा ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो अधिक चिन्हे करील काय?”
32लोकसमुदाय येशूविषयी अशी कुजबुज करीत आहे, हे परुश्यांच्या कानावर गेले म्हणून त्यांनी व मुख्य याजकांनी त्याला अटक करण्याकरता काही अधिकारी पाठवले. 33मग येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर असेन व नंतर ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाईन. 34तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
35ह्यामुळे यहुदी आपसात म्हणाले, “हा असा कुठे जाणार आहे की, तो आपल्याला सापडणार नाही? ज्या ग्रीक शहरांत आपल्या लोकांची पांगापांग झालेली आहे, तेथे जाऊन हा ग्रीक लोकांना शिकवणार की काय? 36‘तुम्ही मला शोधाल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही कारण जेथे मी आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’, ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?”
जीवनदायक पाणी
37सणाच्या शेवटच्या महान दिवशी, येशूने उभे राहून जाहीर आवाहन केले, “ज्याला तहान लागली आहे, त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या अंतःकरणातून, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जीवनदायक पाण्याच्या नद्या वाहतील.” 39त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्यांना जो पवित्र आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. पवित्र आत्मा त्या वेळेपर्यंत दिलेला नव्हता कारण तोपर्यंत येशूचा गौरव झालेला नव्हता.
ख्रिस्ताविषयी मतभेद
40लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणाले, “खरोखर हाच तो संदेष्टा आहे.”
41इतर म्हणत होते, “हा ख्रिस्त आहे”, परंतु आणखी काही म्हणाले, “ख्रिस्त गालीलमधून येणार आहे का? 42दावीदच्या वंशाचा व ज्या बेथलहेममध्ये दावीद राहत होता. त्या नगरातून ख्रिस्त येणार, असे धर्मशास्त्रात सांगितले नाही काय?” 43ह्यामुळे त्याच्यावरून लोकसमुदायात फूट पडली. 44त्यांच्यातील काही लोक त्याला अटक करू पाहत होते तरी पण कोणी त्याच्यावर हात टाकला नाही.
45मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडे अधिकारी परत आले. त्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही त्याला का आणले नाही?”
46अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”
47त्यावरून परुशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसलात का? 48अधिकाऱ्यांपैकी किंवा परुश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का? 49परंतु हा लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही म्हणून तो शापग्रस्त आहे.”
50येशूकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला, 51“एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व त्याने काय केले आहे, ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”
52त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलमधले आहात काय? धर्मशास्त्राचा अभ्यास करून पाहा म्हणजे गालीलमधून कोणी संदेष्टा उदयास येणार नाही, हे तुम्हांला कळेल.” 53[त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले.

Aktuálne označené:

योहान 7: MACLBSI

Zvýraznenie

Zdieľať

Kopírovať

None

Chceš mať svoje zvýraznenia uložené vo všetkých zariadeniach? Zaregistruj sa alebo sa prihlás