मत्तय 26
26
येशूला ठार मारण्याचा कट
1येशूने त्याचे हे बोलणे आटोपल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, 2“तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी ओलांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र क्रुसावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.”
3त्यानंतर कयफा नावाच्या उच्च याजेकांच्या वाड्यात मुख्य याजक व वडील जन जमले. 4येशूला कपटाने धरून ठार मारावे, अशी त्यांनी मसलत केली. 5मात्र ते म्हणाले, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.”
येशूला तेलाचा अभिषेक
6येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोनच्या घरी असता, 7एक स्त्री फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. 8हे पाहून शिष्य संतप्त होऊन म्हणाले, “असा अपव्यय कशाला? 9हे अत्तर विकून चांगलीच रक्कम गोळा करता आली असती व ती गोरगरिबांना देता आली असती.”
10परंतु येशूला हे समजले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. 11गरीब नेहमी तुमच्याबरोबर असतील परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. 12हिने माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले, ते माझ्या उत्तरकार्यासाठी केले आहे. 13मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, सर्व जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.”
यहुदाची फितुरी
14नंतर बारा जणांपैकी एक, यहुदा इस्कर्योत, मुख्य याजकांकडे गेला 15आणि त्याने विचारले, “मी येशूला धरून दिले तर मला काय द्याल?” त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली. 16तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला.
शेवटचे भोजन
17बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूला विचारू लागले, “आपणाकरता ओलांडण सणाचे भोजन आम्ही कोठे तयार करावे, अशी आपली इच्छा आहे?”
18त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, गुरुजी म्हणतात, “माझी वेळ येऊन ठेपली आहे. मी बारा जणांबरोबर तुमच्या येथे ओलांडण सण साजरा करीन.’”
19म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन ओलांडण सणाचे भोजन तयार केले.
20संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर भोजनास बसला. 21ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”
22ते फार अस्वस्थ झाले. एकामागून एक अशा प्रकारे प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभो, मी तर नाही ना?”
23त्याने उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर वाटीत हात घालत आहे, तोच मला धरून देईल. 24मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी जसे लिहिले आहे, त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याच्या भल्याचे झाले असते!”
25त्याला धरून देणाऱ्या यहुदाने विचारले, “गुरुजी, तो मी आहे का?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास तसेच.”
26ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या व खा, हे माझे शरीर आहे.”
27नंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. 28हे माझे कराराचे रक्त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरता ओतले आहे. 29मी तुम्हांला सांगतो, मी माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईन तोपर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.”
30त्यानंतर एक गीत गाऊन ते ऑलिव्ह डोंगरावर निघून गेले.
पेत्राच्या नकाराविषयी भाकीत
31नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्या रात्री मला सोडून पळून जाल कारण असे लिहिले आहे, “मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’ 32परंतु माझ्या पुनरुत्थानानंतर मी तुमच्या आधी गालीलात जाईन.”
33पेत्राने त्याला उत्तर दिले, “जरी सगळे आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.”
34येशूने त्याला म्हटले, “मी तुला निश्चितपणे सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
35पेत्र येशूला म्हणाला, “आपल्याबरोबर मला मरावे लागले तरीदेखील मी आपल्याला नाकारणार नाही!” इतर सर्व शिष्यांनीही तेच म्हटले.
गेथशेमाने बागेत येशू
36नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी गेला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” 37त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले. तो दुःखी व व्याकूळ होऊ लागला. 38“माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून माझ्याबरोबर जागे राहा”, असे बोलून 39काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
40मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत, असे पाहून पेत्राला म्हणाला, “काय, घटकाभरही तुम्हांला माझ्याबरोबर जागे राहवले नाही काय? 41तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.”
42त्याने दुसऱ्यांदा पुढे जाऊन प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, मी प्यायल्याशिवाय हा प्याला दूर केला जाणार नसेल, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” 43त्याने पुन्हा येऊन पाहिले, तर ते झोपलेले होते. त्यांचे डोळे फार जड झाले होते.
44त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. 45त्यानंतर तो त्याच्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पाहा! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. 46उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”
येशूला अटक
47येशू बोलत आहे इतक्यात, बारांमधील एक जण म्हणजे यहुदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडचा एक जमाव तलवारी व सोटे घेऊन आला होता. 48येशूला धरून देणाऱ्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा.’
49यहुदाने लगेच येशूजवळ येऊन, “गुरुवर्य, नमस्कार”, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले.
50येशूने त्याला म्हटले, “मित्रा, ज्याकरता तू आलास ते लवकर उरक.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूला धरले व त्याला अटक केली. 51येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने आपली तलवार उपसली व उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. 52तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार तिच्या जागी परत घाल; कारण तलवार हाती घेणारे सर्व जण तलवारीने मारले जातील. 53तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि तो लगेच मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? 54पण असे झाले, तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, असे म्हणणारे धर्मशास्त्रलेख कसे पूर्ण होतील?”
55त्या घटकेस येशू लोकसमुदायाला म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरायला तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, तेव्हा तुम्ही मला धरले नाही. 56मात्र संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” त्या वेळी सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
न्यायसभेसमोर येशूची चौकशी
57येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे नेले. तेथे शास्त्री व वडीलजन जमले होते. 58परंतु पेत्र त्याच्यामागे काही अंतर ठेवून उच्च याजकांच्या वाड्यापर्यंत गेला व आत जाऊन शेवट काय होतो, हे पाहायला कामगारांमध्ये जाऊन बसला. 59मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होती. 60परंतु बरेच खोटे साक्षीदार जमले असताही तसा पुरावा त्यांना मिळाला नाही. शेवटी दोघे जण पुढे येऊन म्हणाले, 61“‘देवाचे मंदिर मोडायला व तीन दिवसांत ते पुन्हा बांधायला मी समर्थ आहे’, असे ह्याने म्हटले होते.”
62उच्च याजक उठून येशूला म्हणाले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?” 63तथापि येशू काही बोलला नाही. तेव्हा उच्च याजकांनी पुन्हा त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”
64येशू त्यांना म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”
65त्या वेळी उच्च याजकांनी त्यांचीं वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे, आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? आत्ता तुम्ही ह्याचे दुर्भाषण ऐकले आहे. 66तुमचा निर्णय काय?” त्यांनी उत्तर दिले, “हा मरणदंडाला पात्र आहे.”
67ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला मारहाण केली. त्याला चपराका मारणाऱ्यांनी म्हटले, 68“अरे ख्रिस्ता, संदेष्टा म्हणून आम्हांला सांग, तुला कोणी मारले?”
पेत्र येशूला नाकारतो
69इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा उच्च याजकांची एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.”
70परंतु तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” 71तो बाहेर प्रवेशदाराजवळ गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांना म्हटले, “हा नासरेथकर येशूबरोबर होता.”
72पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.”
73काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर तूही त्यांच्यापैकी आहेस; कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे कळते.”
74तो स्वतःला शाप देत व शपथ वाहत म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला! 75‘कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील’, असे जे येशूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. तो बाहेर गेला व भावनाविवश होऊन रडला.
Currently Selected:
मत्तय 26: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.