Logótipo YouVersion
Ícone de pesquisa

लूक 18

18
सातत्यपूर्वक प्रार्थना
1शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: 2‘एका नगरात एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. 3त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन आर्जवून विनंती करत असे, ‘माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.’ 4काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, 5तरी ही विधवा मला भंडावून सोडते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन माझा जीव खाईल.’”
6प्रभूने म्हटले, “दुष्ट न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. 7तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? 8मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तथापि मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
परुशी व जकातदार
9आपण नीतिमान आहोत, असा स्वतःविषयी भरवसा बाळगून जे कित्येक जण इतर सर्वांना तुच्छ मानत होते; त्यांनाही त्याने एक दाखला सांगितला. तो असा:
10‘एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करायला मंदिरात गेले. 11परुश्याने एकटे निराळे उभे राहून मनातल्या मनात अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लोभी, अप्रामाणिक आणि व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. 12मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश दान देतो.’
13जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावायलादेखील न धजता आपला ऊर बडवीत प्रार्थना करत होता, ‘हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.’ 14मी तुम्हांला सांगतो, त्या परुशी माणसापेक्षा हा जकातदार नीतिमान ठरून आपल्या घरी परतला. स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्याला लीन केले जाईल आणि स्वतःला लीन करणाऱ्याला उंच केले जाईल.”
लहान मुलांना आशीर्वाद
15येशूने स्पर्श करावा म्हणून काही लोकांनी त्यांची तान्ही बाळेदेखील त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यांना दटावू लागले. 16तेव्हा येशूने बालकांना स्वतःजवळ बोलावून म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका. देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. 17मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात मुळीच प्रवेश होणार नाही.”
शाश्वत जीवन व धनाची आडकाठी
18एका यहुदी अधिकाऱ्याने येशूला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! मी काय केल्याने मला शाश्वत जीवन वतन म्हणून मिळेल?”
19येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी चांगला नाही. 20तुला आज्ञा ठाऊक आहेत:व्यभिचार करू नकोस; खून करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान कर.”
21तो म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.”
22हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझे अनुकरण कर.” 23पण हे ऐकून तो अतिशय खिन्‍न झाला कारण तो फार श्रीमंत होता.
24त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धनसंपत्ती आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! 25श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”
26ज्यांनी हे ऐकले त्यांनी विचारले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
27त्याने उत्तर दिले, “जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे.”
28पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आमचे घरदार सोडून तुला अनुसरलो आहोत.”
29येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला निश्चित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत, 30त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात शाश्वत जीवन मिळेल.”
स्वतःच्या मृत्यूविषयी येशूचे तिसरे भाकीत
31त्याने बारा शिष्यांना बाजूला घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण यरुशलेम येथे चाललो आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांद्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. 32त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल. त्याची कुचेष्टा व विटंबना होईल. त्याच्यावर थुंकतील. 33त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल.”
34शिष्यांना मात्र ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही. खरे म्हणजे हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते म्हणून सांगितलेल्या गोष्टी त्यांना समजल्या नव्हत्या.
आंधळ्याला दृष्टिदान
35येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. 36त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय चालले आहे?”
37त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.”
38तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”
39त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरीही तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.”
40तेव्हा येशूने उभे राहून त्याला स्वतःकडे आणण्याचा आदेश दिला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, 41“मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी मिळावी.”
42येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी मिळो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
43तत्क्षणी त्याला दृष्टी मिळाली आणि तो देवाचा महिमा वर्णन करीत त्याच्यामागे चालू लागला. हे पाहून सर्व लोकांनी देवाचे स्तवन केले.

Atualmente selecionado:

लूक 18: MACLBSI

Destaque

Partilhar

Copiar

None

Quer salvar os seus destaques em todos os seus dispositivos? Faça o seu registo ou inicie sessão