उत्पत्ती 45
45
योसेफ आपल्या भावांना ओळख देतो
1तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना; त्याने मोठ्याने म्हटले की, “सर्व लोकांना बाहेर घालवा.” योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते.
2तो मोठमोठ्याने रडू लागला, ते मिसरी लोकांनी ऐकले, आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले.
3योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे; माझा बाप अजून जिवंत आहे काय?” त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याच्यापुढे अतिशय घाबरले.
4योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “अंमळ जवळ या.” आणि ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले तो मीच.
5तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले ह्याबद्दल आता काही दु:ख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले.
6ह्या देशात आज दोन वर्षे दुष्काळ आहे; आणखी पाच वर्षे अशी येणार आहेत की त्यांत नांगरणी-कापणी काही व्हायची नाही.
7देवाने मला तुमच्यापुढे ह्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; महान सुटकेद्वारे तुम्हांला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.
8तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले; मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेवले आहे.
9तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की, देवाने मला अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे तर माझ्याकडे निघून या, विलंब करू नका;
10तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे; तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्वकाही घेऊन माझ्याजवळ राहावे.
11कारण पाच वर्षे दुष्काळ पडायचा आहे, तर येथे मी तुमचे संगोपन करीन; अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही.
12पाहा, मी योसेफ तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत आहे हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन ह्याच्या डोळ्यांना दिसतच आहे.
13मिसरातले माझे सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करा व माझ्या बापास इकडे घेऊन या.”
14तो आपला भाऊ बन्यामीन ह्याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला.
15आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला; त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले.
16योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहचली. ती ऐकून फारोला व त्याच्या चाकरांना आनंद झाला.
17फारो योसेफाला म्हणाला, “तू आपल्या भावांना सांग, एवढे करा की, आपली जनावरे लादून निघा व कनान देशाला जा;
18आणि आपला बाप व आपली मुलेमाणसे ह्यांना घेऊन माझ्याकडे या, म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हांला देईन व ह्या देशातले उत्तम पदार्थ तुम्हांला खायला मिळतील.
19आता तुला माझी आज्ञा आहे की, तुम्ही एवढे करा : आपल्या बायकामुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापालाही घेऊन या.
20आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका, सार्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे.”
21इस्राएलाच्या मुलांनी तसे केले आणि फारोच्या हुकुमाप्रमाणे योसेफाने त्यांना गाड्या व वाटेची शिधासामग्री दिली.
22त्याने प्रत्येकाला एकेक नवा पोशाख दिला आणि बन्यामिनाला तीनशे रुपये आणि पाच नवे पोशाख दिले.
23त्याचप्रमाणे त्याने आपल्या बापासाठी मिसरातील उत्कृष्ट पदार्थ लादलेली दहा गाढवे आणि धान्य, भाकरी व वाटेसाठी इतर अन्नसामग्री ह्यांनी लादलेल्या दहा गाढवी रवाना केल्या.
24ह्या प्रकारे त्याने आपल्या भावांची रवानगी केल्यावर ते मार्गस्थ झाले; जाताना तो त्यांना म्हणाला, “सांभाळा, वाटेत भांडू नका.”
25ते मिसरातून निघून वर कनान देशात आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहचले.
26योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना.
27मग योसेफाने त्यांना सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले आणि त्यांचा बाप याकोब ह्याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठवलेल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जिवात जीव आला.
28आणि इस्राएल म्हणाला, “पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन.”
Markert nå:
उत्पत्ती 45: MARVBSI
Marker
Del
Kopier

Vil du ha høydepunktene lagret på alle enhetene dine? Registrer deg eller logg på
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.