उत्पत्ती 12
12
अब्रामाला देवाचे पाचारण
1परमेश्वराने अब्रामाला सांगितले, “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा;
2मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;
3तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”
4परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला; हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय पंचाहत्तर वर्षांचे होते.
5आपली बायको साराय, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहचले.
6अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.
7परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.
8मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.
9तेथून निघून अब्राम प्रवास करत नेगेबकडे गेला.
अब्रामाचे मिसर देशात वास्तव्य
10पुढे देशात दुष्काळ पडला; तेव्हा काही दिवस मिसरात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता.
11तो मिसरात प्रवेश करणार तोच तो आपली बायको साराय हिला म्हणाला, “पाहा तू दिसायला सुंदर स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे;
12तुला मिसरी लोक पाहतील तेव्हा ही ह्याची बायको आहे असे म्हणतील, आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील.
13तर मी ह्याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल.”
14मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसर्यांनी पाहिले.
15फारोच्या सरदारांनी तिला पाहून फारोजवळ तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेवले.
16तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले, आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले.
17तरी अब्रामाची स्त्री साराय हिच्यामुळे परमेश्वराने फारो व त्याचे घराणे ह्यांना भारी पीडा भोगायला लावली.
18तेव्हा फारोने अब्रामाला बोलावून म्हटले, “तू मला हे काय केलेस? ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितलेस?
19ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितलेस? मी तिला आपली बायको करण्यासाठी माझ्याकडे ठेवले होते; तर आता ही पाहा तुझी बायको, हिला घेऊन जा.”
20तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्यासंबंधाने हुकूम केला, आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेला लावले.
Markert nå:
उत्पत्ती 12: MARVBSI
Marker
Del
Kopier

Vil du ha høydepunktene lagret på alle enhetene dine? Registrer deg eller logg på
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.