मत्तय 14

14
बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचा शिरच्छेद
1त्यावेळी प्रांताधिकारी हेरोद#14:1 हेरोद महा हेरोद जो येशूंच्या जन्माच्या वेळी होता त्याचा मुलगा याने येशूंविषयी ऐकले, 2तो आपल्या सेवकांना म्हणाला, “हा मेलेल्यातून जिवंत होऊन आलेला बाप्तिस्मा करणारा योहानच आहे! म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे.”
3आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते. 4कारण योहान त्याला म्हणत असे: “तू तिला ठेवावे हे कायद्याने योग्य नाही.” 5म्हणून हेरोद त्याचा जीव घेण्‍यास पाहत होता, पण लोकांना तो भीत होता, कारण योहान संदेष्टा आहे असे लोक मानत होते.
6हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले. 7त्यामुळे वचन देऊन ती मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली. 8तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.” 9तेव्हा राजा अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे त्याने मुलीची मागणी अंमलात आणण्यासाठी हुकूम दिला. 10आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला. 11आणि त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला देण्यात आले व तिने ते आपल्या आईला दिले. 12योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले.
येशू पाच हजारांना जेवू घालतात
13जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतल्या लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले. 14जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना कळवळा आला व त्यांनी आजार्‍यांना बरे केले.
15संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, “ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या खेड्यात आणि गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”
16यावर येशूंनी उत्तर दिले, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”
17त्यांनी उत्तर दिले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
18येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.” 19मग येशूंनी लोकांना गवतावर बसण्यास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्यांबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. 20ते सर्व खाऊन तृप्त झाले, आणि शिष्यांनी जेवणानंतर उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. 21जेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.
येशू पाण्यावरून चालतात
22लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले, आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. 23त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तेथे ते एकांती होते. 24तेव्हा होडी किनार्‍यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती.
25पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. 26शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.”
27पण येशू त्यांना ताबडतोब म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
28मग पेत्र म्हणाला, “प्रभुजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा.”
29ते म्हणाले “ये.”
तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला. 30परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, “प्रभुजी, मला वाचवा!” त्याने आरोळी मारली.
31तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, “अल्पविश्वासी तू संशय का धरलास?”
32मग ते होडीत चढले आणि वादळ शांत झाले आणि वारा थांबला. 33होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, “खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.”
34ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले. 35तेथील लोकांनी येशूंना ओळखले व आसपासच्या सर्व भागात संदेश पाठविला. लोकांनी सर्व आजारी लोकांना त्यांच्याकडे आणले. 36“तुमच्या झग्याच्या काठाला तरी आम्हाला शिवू द्या.” अशी त्यांनी त्यांना विनंती केली आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.

Nu geselecteerd:

मत्तय 14: MRCV

Markering

Deel

Kopiëren

None

Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in