मत्तय 10

10
येशू बारा शिष्यांना कामगिरीवर पाठवितात
1येशूंनी आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा अधिकार दिला आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला.
2त्यांच्या बारा शिष्यांची नावे ही:
शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया,
जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान,
3फिलिप्प आणि बर्थलमय;
थोमा आणि मत्तय जकातदार;
अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय,
4शिमोन कनानी आणि यहूदा इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले.
5येशूंनी बारा जणांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका 6इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. 7जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी त्यांना घोषणा करा. 8आजार्‍यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला मुक्तहस्ताने मिळाले आहे, तुम्हीही मुक्तहस्ते द्या.
9“प्रवासाला जाताना कमरपट्ट्यात सोने, चांदी किंवा तांबे असे काहीही घेऊ नका. 10तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी त्याच्या वेतनास पात्र आहे. 11ज्या एखाद्या शहरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, त्यावेळी एखाद्या योग्य मनुष्याचा शोध करा आणि निघेपर्यंत त्याच्याच घरी राहा. 12एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या. 13ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल. 14जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे ऐकण्यास तयार झाले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून बाहेर पडतांना त्या ठिकाणची धूळ तेथेच झटकून टाका. 15मी तुम्हाला निश्चित सांगतो की, खरोखर न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.
16“मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवीत आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे भोळे असा. 17तुम्ही सावध असले पाहिजेत. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल. 18तुम्हाला माझ्या नावासाठी त्यांना व गैरयहूदीयांना साक्ष व्हावी म्हणून अधिकारी व राजांसमोर आणले जाईल. 19तुम्हाला अटक करून नेल्यावर न्यायालयासमोर काय बोलावे व कसे बोलावे याची चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला काय बोलावे ते सुचवले जाईल. 20कारण तुम्ही बोलणार नाही पण तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
21“भाऊ भावाला, पिता आपल्या पोटच्या लेकरांना ठार मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील. 22माझ्यामुळे#10:22 माझ्यामुळे मूळ भाषेत माझा नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्यांचे मात्र तारण होईल. 23तुमचा एका शहरात छळ होऊ लागला की दुसर्‍या शहरात पळून जा. कारण मी तुम्हाला खचित सांगतो मनुष्याचा पुत्र येण्याअगोदर इस्राएलाच्या नगरांमधून तुमचे फिरणे संपणारच नाही.
24“शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही किंवा दास आपल्या धन्यापेक्षा श्रेष्ठ नाही. 25शिष्याने आपल्या गुरू सारखे असणे आणि दासाने आपल्या धन्यासारखे असणे पुरे आहे. जर घर प्रमुखाला बालजबूल#10:25 बालजबूल अर्थात् भूतांचे प्रभू म्हटले, तर घरच्या सभासदांना कितीतरी अधिक म्हणतील!
26“तुम्ही त्यांना भिऊ नका, जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. 27आता मी तुम्हाला अंधारात सांगत आहे ते दिवसाच्या प्रकाशात सांगा; जे मी तुमच्या कानात सांगत आहे ते घराच्या धाब्यावरून जाहीर करा. 28जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात त्या परमेश्वराचे मात्र भय धरा. 29एका पैशात दोन चिमण्या विकत मिळतात, तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडत नाही. 30आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. 31म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
32“जो कोणी मला जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करीन. 33तरी जे मला येथे लोकांसमोर नाकारतात, तर मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारीन.
34“मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यास आलो आहे.
35“ ‘पुत्राला आपल्या पित्याविरुद्ध,
मुलीला आपल्या आईविरुद्ध,
आणि सूनेला तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे.
36एखाद्या मनुष्याच्या स्वतःच्या घरातीलच लोक त्याचे शत्रू होतील.’#10:36 मीखा 7:6
37“जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडिलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल तर ते मला पात्र नाही. 38जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला पात्र नाही. 39जो आपल्या जीवाला जपतो, तो आपला जीव गमावील आणि जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो, तो आपला जीव सुरक्षित राखील.
40“जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात. 41जो संदेष्ट्यांचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल; जो कोणी नीतिमान मनुष्याचा स्वीकार नीतिमान आहे म्हणून करतो, त्याला नीतिमान मनुष्याचे प्रतिफळ मिळेल. 42मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला जो माझा शिष्य आहे त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”

Nu geselecteerd:

मत्तय 10: MRCV

Markering

Deel

Kopiëren

None

Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in