उत्पत्ती 6

6
जगातील दुष्टाई
1पृथ्वीवर मानवाची संख्या खूप वाढू लागली आणि त्यांना कन्या झाल्या. 2परमेश्वराच्या पुत्रांनी बघितले की मानवाच्या कन्या सुंदर आहेत; आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. 3तेव्हा याहवेह म्हणाले, “माझा आत्मा मानवासोबत वादविवाद करीत राहणार नाही,#6:3 किंवा माझा आत्मा त्यांच्यात वसणार नाही कारण ते दैहिक#6:3 किंवा भ्रष्ट आहेत आणि त्यांचा जीवनकाल एकशेवीस वर्षे असेल.”
4त्या दिवसात—आणि नंतरच्या काळातही—महाबलाढ्य मानव पृथ्वीवर वास करीत होते, जेव्हा परमेश्वराच्या पुत्रांनी मानवकन्यांशी विवाह केला, त्यांना संतती झाली. तेच जुन्या काळातील समर्थ आणि प्रसिद्ध मानव झाले.
5पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले. 6आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या. 7म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.” 8परंतु नोआहवर याहवेहची कृपादृष्टी झाली.
नोआह आणि जलप्रलय
9नोआह आणि त्याच्या कुटुंबाचा वृतांत असा.
नोआह आपल्या काळाच्या पिढीत एक नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता आणि तो परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालला. 10नोआहला शेम, हाम व याफेथ हे तीन पुत्र झाले.
11परमेश्वराच्या दृष्टीने पृथ्वी पापाने भ्रष्ट झालेली आणि हिंसाचाराने पूर्णपणे भरलेली होती. 12जग किती पातकी झाले आहे आणि समस्त मानवजात किती भ्रष्ट झाली आहे हे परमेश्वराने पाहिले. 13तेव्हा परमेश्वर नोआहला म्हणाले, “मी सर्व मनुष्यांचा नाश करेन, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी हिंसाचाराने भरून गेली आहे. मी निश्चितपणे त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करणार आहे. 14तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. 15ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच#6:15 अंदाजे 135 मीटर लांब, 23 मीटर रुंद, 14 मीटर उंच असावे. 16त्याकरिता छत तयार कर, तारवाला वरच्या बाजूला एक खिडकी कर. ही खिडकी छतापासून खाली सभोवती एक हात उंच#6:16 अंदाजे 45 सें.मी. असावी. तसेच तारवाला वरचा, मधला आणि खालचा असे तीन मजले बांध आणि तारवाच्या एका बाजूला दार कर. 17मी पृथ्वी महापुराने भरून टाकणार आहे आणि आकाशाखाली ज्यामध्ये जीवनाचा श्वास आहे, अशा प्रत्येक सजीव प्राण्याचा मी नाश करणार आहे. पृथ्वीवर जे काही आहे त्याचा नाश होईल. 18परंतु मी तुझ्यासोबत करार स्थापित करेन—तू आणि तुझे पुत्र आणि तुझी पत्नी व तुझ्या पुत्रांच्या पत्नी हे तारवात प्रवेश करतील. 19तू प्रत्येक जातीचे दोन-दोन पशू, एक नर व एक मादी, अशा जोड्या जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात घेऊन ये. 20प्रत्येक प्रकारचे पक्षी, प्रत्येक प्रकारचे प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे प्रत्येकी दोन-दोन प्राणी जिवंत राहण्यासाठी तुझ्याकडे येतील. 21आणि खावयाचे सर्वप्रकारचे अन्न घे आणि ते स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी साठवून ठेव.”
22परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणेच नोआहने सर्वकाही केले.

Markering

Deel

Kopiëren

None

Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in

Video voor उत्पत्ती 6