लूक 7
7
रोमन अधिकाऱ्याचा विश्वास
1ही सर्व वचने लोकांना सांगून झाल्यावर येशू कफर्णहूम गावी गेला. 2तेथे एका रोमन अधिकाऱ्याच्या मर्जीतला दास आजारी पडून मरणास टेकला होता. 3त्याने येशूविषयी ऐकून यहुदी लोकांच्या काही वडील मंडळींना त्याच्याकडे पाठवले व विनंती केली, “आपण येऊन माझ्या दासाला वाचवा.” 4त्यांनी येशूकडे येऊन कळकळीने विनंती केली, “आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे. 5कारण आपल्या राष्ट्रावर तो प्रेम करतो आणि त्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे.”
6येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घराजवळ येताच रोमन अधिकाऱ्याने त्याच्याकडे त्याच्या मित्रांना पाठवून त्याला विनंती केली, “प्रभो, आपण तसदी घेऊ नका कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. 7ह्यामुळे आपल्याकडे येण्यास मी स्वतःला योग्य मानले नाही; आपण एक शब्द बोलला तरी माझा चाकर बरा होईल. 8कारण मीदेखील अधिकारी असून माझ्या हाताखाली सैनिक आहेत. मी एकाला जा म्हटले तर तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले तर तो येतो, माझ्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.”
9हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्यामागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलमध्येही आढळला नाही!”
10आणि ज्यांना पाठविले होते, ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.
विधवेचा मुलगा
11नंतर लवकरच येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याचे शिष्य व बरेच लोक त्याच्याबरोबर गेले. 12तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला, तेव्हा तेथून एका मृत माणसाची अंत्ययात्रा जात होती. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती. त्या नगरातले पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. 13तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.” 14जवळ जाऊन त्याने शवपेटीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” 15तो मृत माणूस उठून बसला व बोलू लागला. येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.
16सर्वांना भय वाटले व ते देवाचा गौरव करत म्हणाले, “आमच्यामध्ये महान संदेष्टा उदयास आला आहे, देवाने त्याच्या लोकांची भेट घेतली आहे.”
17त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात व भोवतालच्या सर्व प्रदेशांत पसरली.
बाप्तिस्मा देणारा योहान
18ह्या सर्व गोष्टी त्याच्या शिष्यांनी योहानला सांगितल्या. 19योहानने त्याच्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले, “जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
20त्यांनी त्याच्याकडे येऊन विचारले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने आम्हांला आपल्याकडे असे विचारायला पाठवले आहे की, जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
21त्याच घटकेस त्याने रोग, पीडा व दुष्ट आत्मे ह्यांपासून अनेकांना मुक्त केले आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टी दिली. 22त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा. आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मृत उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते. 23जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य होय.”
24योहानने पाठवलेले शिष्य गेल्यावर तो योहानविषयी लोकसमुदायाला सांगू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालवलेला बोरू काय? 25तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे परिधान केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोषाख घालणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात. 26तर तुम्ही काय पाहायला गेला होता? संदेष्ट्याला काय? मी तुम्हांला सांगतो, हो, संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. 27‘पाहा, मी माझा संदेशहर तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तोच तो आहे. 28मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानपेक्षा मोठा कोणी नाही, तरीही देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”
29जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचा संदेश ऐकून परमेश्वराचे समर्थन केले कारण त्यांनी योहानचा बाप्तिस्मा घेतला होता. 30परंतु परुशी व शास्त्री ह्यांनी त्यांच्यासंबंधी असलेली देवाची योजना फोल ठरवली कारण त्यांनी त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता.
31येशू पुढे म्हणाला, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत? 32जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत. ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत.’ 33बाप्तिस्मा देणारा योहान भाकर खात किंवा द्राक्षारस पीत आला नाही आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे. 34मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र! 35परंतु सुज्ञता स्वीकारणारे त्या सुज्ञतेची सत्यता स्वतःच्या जीवनाद्वारे सिद्ध करतात.”
परुशी आणि पापी स्त्री
36परुश्यातील एकाने येशूला आपल्या घरी भोजन करण्याची विनंती केली. तो त्या परुश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला. 37त्या गावात एक पापी स्त्री होती. तो परुश्याच्या घरात जेवायला बसला आहे, हे ऐकून ती अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन आली 38आणि त्याच्या पायांजवळ रडत उभी राहिली व तिच्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने तिच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. 39ज्या परुश्याने त्याला बोलाविले होते, त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता, तर आपल्याला स्पर्श करत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”
40येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरुजी, बोला.”
41“एका सावकाराचे दोन कर्जदार होते”, येशूने बोलायला सुरुवात केली. “एकाने पाचशे चांदीची नाणी तर दुसऱ्याने पन्नास चांदीची नाणी कर्ज घेतले होते. 42कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांचे कर्ज माफ केले. तर त्यांच्यातील कोणता माणूस त्याच्यावर अधिक प्रीती करील?”
43शिमोनने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर आहे तुझा निर्णय.” 44तेव्हा येशूने त्या स्त्रीकडे वळून शिमोनला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो, तेव्हा तुम्ही मला पाय घुण्यासाठी पाणी दिले नाही. परंतु हिने तर आसवांनी माझे पाय भिजवून तिच्या केसांनी ते पुसले. 45तुम्ही चुंबनाने माझे स्वागत केले नाही. परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. 46तुम्ही माझ्या मस्तकाला ऑलिव्ह तेल लावले नाही. परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. 47म्हणून मी तुम्हांला सांगतो, हिची पापे पुष्कळ असूनही त्यांची तिला क्षमा करण्यात आली आहे; कारण तिची प्रीती महान आहे. परंतु ज्याला थोडी क्षमा मिळाली आहे, तो थोडी प्रीती करतो.”
48मग त्याने तिला म्हटले,”तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.”
49तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा आहे तरी कोण?”
50त्यानंतर त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”
Nu geselecteerd:
लूक 7: MACLBSI
Markering
Deel
Kopiëren
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fnl.png&w=128&q=75)
Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.