उत्पत्ती 16

16
हागार आणि इश्माएल
1अब्रामाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मूलबाळ झाले नव्हते; तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती.
2साराय अब्रामाला म्हणाली, “पाहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे; तर माझ्या दासीपाशी जा; कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल,” तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला.
3अब्रामाला कनान देशात राहून दहा वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम ह्याला आपली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली.
4तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली; आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली.
5तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी; मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे, परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.”
6अब्राम सारायला म्हणाला, “पाहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर.” मग साराय तिचा जाच करू लागली, तेव्हा ती तिला सोडून पळून गेली.
7रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्‍याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली.
8तो म्हणाला, “हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे?” ती म्हणाली, “माझी धनीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
9परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या धनीणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे सोशीत राहा.”
10परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही.”
11परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “पाहा, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माएल ठेव; कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे.
12तो रानगाढवासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल, व सर्वांचा हात त्याच्यावर चालेल; तो आपल्या सर्व भाऊबंदांच्या देखत पूर्वेस वस्ती करील.”
13तिच्याशी बोलणार्‍या परमेश्वराचे नाव तिने आत्ता-एल-रोई (तू पाहणारा देव) असे ठेवले; ती म्हणाली, “मला पाहणार्‍याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय?”
14ह्यावरून त्या विहिरीचे नाव बैर-लहाय-रोई (मला पाहणार्‍या जिवंताची विहीर) असे पडले; कादेश व बेरेद ह्यांच्या दरम्यान ही विहीर आहे.
15हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; हागारेपासून झालेल्या आपल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.
16हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.

Highlight

Kongsi

Salin

None

Ingin menyimpan sorotan merentas semua peranti anda? Mendaftar atau log masuk