YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रूथ 2:1-22

रूथ 2:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता; तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता, त्याचे नाव बवाज असे होते. मवाबी रूथ नामीला म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्यामागे मी धान्याचा सरवा वेचीत जाईन.” तेव्हा तिने म्हटले, “माझ्या मुली, जा.” मग ती निघून शेतात गेली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली, तेव्हा असे झाले की, शेताच्या ज्या भागात ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातला बवाज याचा होता. आणि पाहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, “परमेश्वर तुम्हाबरोबर असो,” आणि त्यांनी उत्तर दिले “परमेश्वर तुला आशीर्वादित करो.” मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, “ही तरुण स्त्री कोण आहे?” कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी कन्या आहे. ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या.’ ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचीत आहे, आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे.” बवाज रूथला म्हणाला, “मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. मी या लोकांस तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागल्यास पाण्याच्या भांड्याकडे जाऊन नोकरांनी जे पाणी भरून ठेवले त्यातील पाणी पी.” तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, “मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?” बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू आपल्या आई-वडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परिचित नाहीत अशा लोकात तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. ज्याच्या पंखाचा आश्रय करावयास तू आली आहेस तो इस्राएलाचा देव परमेश्वर तुला पुरे पारितोषिक देवो.” मग ती म्हणाली, “माझ्या प्रभू, आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.” भोजन करतेवेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा. या कढीत आपली भाकर बुडव.” कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीला ती बसली व त्याने तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. ती सरवा वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्याला सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका. आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.” तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले. ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले. तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचला? आणि हे काम कोठे केलेस? ज्याने तुला मदत केली, त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात आज काम केले ते तिने सासूला सांगितले. ती म्हणाली, “ज्याच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज आहे.” नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करण्याचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा मनुष्य आपल्या नातलगांपैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे.” मग मवाबी रूथने सांगितले; “तो मला असेही म्हणाला की, ‘माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा.’” नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच नोकरीणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे.”

सामायिक करा
रूथ 2 वाचा

रूथ 2:1-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज असे होते. आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.” नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.” तेव्हा ती गेली, तिने एका शेतात प्रवेश केला आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे राहिलेले धान्य जमा करू लागली, संयोगाने ते शेत बवाजच्या मालकीचे होते, जो एलीमेलेखच्या कुळातील होता. त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्‍यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!” बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?” त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे. ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्‍यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.” तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्‍या स्त्रियांबरोबर इथेच राहा. ज्या शेतात माणसे कापणीचे काम करीत आहेत तिकडे लक्ष ठेव आणि या स्त्रियांच्या बरोबरीने त्यांच्यामागे जात राहा. तुला त्रास न देण्याबद्दल मी माणसांना सांगून ठेवले आहे. जेव्हा तुला तहान लागेल, तेव्हा तू जाऊन माणसांनी भरून ठेवलेल्या या रांजणातील पाणी पीत जा.” त्यावर तिने तिचे मुख जमिनीकडे खाली लवून ते मान्य केले. ती त्याला म्हणाली, “मी एक परदेशी असूनही तुम्ही माझ्यावर एवढी कृपादृष्टी का बरे दाखवित आहात?” बवाज म्हणाला, “तुझ्या पतीच्या निधनानंतर तू तुझ्या सासूसाठी जे काही केले ते सर्व मला सांगण्यात आलेले आहे—कशाप्रकारे तू तुझ्या वडिलांकडे आणि आईकडे आणि तुझ्या गावाकडे जाण्याचे मान्य केले नाहीस आणि अशा लोकांबरोबर राहण्यास आली आहेस की, ज्यांना तू ओळखत नाही. तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.” तेव्हा ती म्हणाली, “हे स्वामी, तुमच्याकडून माझ्यावर सतत कृपा होत रहावी, जरी मी तुमच्या एखाद्या नोकरांपैकी नाही तरी तुमच्या या दासीबरोबर दयाळूपणाने बोलण्याने मला समाधान झाले आहे.” भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.” जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते. जेव्हा ती उरलेले धान्य जमा करण्यास उठली, तेव्हा बवाजाने त्याच्या माणसांना आज्ञा दिल्या, “तिला पेंढ्यांमधून राहिलेले धान्य गोळा करू द्या आणि तिला मनाई करू नका. उलट पेंढ्यांतून काही ताटे ओढून तिला वेचण्यासाठी पडू द्या, आणि तिला धमकावू नका.” अशाप्रकारे रूथने शेतात संध्याकाळपर्यंत धान्य वेचले. नंतर तिने गोळा केलेल्या जवाची झोडपणी केली आणि ते एकूण एक एफा भरले. ते घेऊन ती नगरात गेली आणि तिच्या सासूने पाहिले की तिने किती गोळा केले आहे. रूथने खाऊन राहिलेले अन्नसुद्धा आणले आणि ते तिला दिले. तिच्या सासूने तिला विचारले, “धान्य गोळा करण्यासाठी आज तू कुठे गेली होतीस? तू कुठे काम केलेस? ज्याने तुझी एवढी काळजी घेतली, तो मनुष्य आशीर्वादित असो!” तेव्हा रूथने तिच्या सासूला त्याच्याबद्दल सांगितले ज्याच्या ठिकाणी ती काम करीत होती. ती म्हणाली, “ज्या माणसाबरोबर मी आज काम केले त्याचे नाव बवाज असे आहे,” नाओमी तिच्या सुनेला म्हणाली, “याहवेह त्याला आशीर्वादित करो! त्याने जिवंतांना आणि मृतांना त्याचा चांगुलपणा दाखविणे थांबविले नाही.” ती पुढे म्हणाली, “तो मनुष्य आपला जवळचा नातेवाईक आहे; तो आम्हाला सोडविणाऱ्यांपैकी एक आहे.” तेव्हा मोआबी रूथ म्हणाली, “तो मला असेही म्हणाला की, ‘जोपर्यंत ते माझ्या संपूर्ण धान्याची कापणी करीत आहेत, तोपर्यंत माझ्या कामकऱ्यांबरोबर राहा.’ ” नाओमी तिची सून रूथला म्हणाली, “माझ्या मुली, त्याच्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर जाणे हे तुझ्यासाठी हिताचे होईल, कारण दुसर्‍या कोणाच्याही शेतात तुझ्यावर अत्याचार होण्याची शक्यता आहे.”

सामायिक करा
रूथ 2 वाचा

रूथ 2:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नामीच्या नवर्‍याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते. मवाबी रूथ नामीस म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचत जाईन; ती म्हणाली, “मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणार्‍यांच्या मागून सरवा वेचू लागली. आणि असे झाले की, शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता. बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणार्‍यांना म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो.” मग बवाज कापणी करणार्‍यांच्या मुकादमाला म्हणाला, “ही मुलगी कोणाची?” कापणी करणार्‍यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय. ती मला म्हणाली, ’कृपा करून कापणी करणार्‍यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या; ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचत आहे, थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती.”’ बवाज रूथला म्हणाला, “मुली, ऐकतेस ना? तू दुसर्‍याच्या शेतात सरवा वेचायला येथून जाऊ नकोस; येथेच माझ्या मोलकरणींबरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा; तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी ह्या गड्यांना दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्यांकडे जाऊन ह्या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी.” तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, “माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतलात ह्याचे काय कारण बरे?” बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस ही सविस्तर हकिकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या पंखांखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो.” ती म्हणाली, “महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्यावी; मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.” भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा; ह्या कढीत आपली भाकर बुडव.” त्या कापणी करणार्‍यांच्या पंक्तीला ती बसली. त्यांनी तिला हुरडा दिला; तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. ती सरवा वेचायला निघाली तेव्हा बवाजने आपल्या गड्यांना सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका; आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.” तिने ह्या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा वेचला. तिने वेचून आणलेला सरवा झोडला, त्याचे एफाभर सातू निघाले. ते घेऊन ती नगरात गेली; तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले; तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले. तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचलास? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले; ती म्हणाली, “ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज.” नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही तो त्याचे कल्याण करो.” नामी तिला आणखी म्हणाली, “हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्याला हक्क आहे.” मग मवाबी रूथने सांगितले की, “तो मला असेही बोलला की, ’माझे गडी सर्व कापणी करीपर्यंत त्यांच्या मागोमाग राहा.”’ नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच मोलकरणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांना आढळू नयेस हे बरे.”

सामायिक करा
रूथ 2 वाचा