YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 7:7-25

रोमकरांस पत्र 7:7-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता. पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते. कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो. आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले. पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले. म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे. मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न होवो. पण जी चांगली आहे, तिच्या योगे, पाप हे पाप असे प्रकट व्हावे, म्हणून माझ्यात, ती मरण हा परिणाम घडविते; म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले. कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे. कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो. मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो. मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. कारण मी जाणतो की, माझ्यात, म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही. कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो. मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो. कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो; पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवील? मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

रोमकरांस पत्र 7:7-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तर मग आपण काय म्हणावे? नियम पापमय आहे का? नक्कीच नाही! नियमाशिवाय पाप काय आहे हे मला समजले नसते. “तू लोभ करू नको,” असे नियमशास्त्र मला म्हणाले नसते, तर लोभ काय आहे हे मला कधीच समजले नसते. परंतु पापाने नियमांचा फायदा घेऊन संधी साधून माझ्यामध्ये सर्वप्रकारचा लोभ उत्पन्न केला; कारण नियमांशिवाय पाप मृत आहे. अशी वेळ होती जेव्हा मी नियमशास्त्राशिवाय जिवंत होतो; परंतु आज्ञा आल्यावर, पाप जीवित झाले आणि मी मरण पावलो. वास्तविक ज्या आज्ञांनी जीवन द्यावयास पाहिजे होते, त्याच आज्ञांनी मरण आले हे मला आढळून आले. पापाने आज्ञांच्या योगे गैरफायदा घेऊन मला फसवले, आणि आज्ञांच्या द्वारे मला ठार मारले. वास्तविक नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, न्याययुक्त आणि उत्तम आहेत. परंतु जे उत्तम ते माझ्या मरणास कारणीभूत झाले काय? असे नक्कीच नाही. पाप ते पाप दिसावे, आणि चांगल्याद्वारे पापाने माझ्यामध्ये मृत्यू उत्पन्न केला, यासाठी की आज्ञेद्वारे पाप हे पराकोटीचे पाप दिसून यावे. नियमशास्त्र आध्यात्मिक आहे; हे आपल्याला माहीत आहे. पण मी तर पापाला गुलाम म्हणून विकलेला दैहिक प्राणी आहे. मी काय करतो हे मला समजत नाही. कारण जे मला करावेसे वाटते, ते मी करत नाही, जे करण्याचा मला तिटकारा येतो, तेच मी करीत असतो. जर मी जे करू नये ते करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो. कारण या गोष्टी करणारा मी स्वतः नाही, तर माझ्यामध्ये वसत असलेले पाप करते. माझ्या देहस्वभावा मध्ये काहीच चांगले वसत नाही. वास्तविक जे चांगले ते करण्याची मला इच्छा असते पण मला ते करता येत नाही. चांगले करावे असे मला वाटते, पण मी ते करीत नाही, परंतु वाईट जे मला करावेसे वाटत नाही ते मी करीत राहतो. आता जे मला करावयास नको असते, तेच मी करतो, ते मी नाही तर जे पाप माझ्यामध्ये वसते ते करते. योग्य ते करावे, असे मला वाटते, पण वाईट माझ्या अगदी जवळच असते, हा नियम कार्यरत आहे असे मला आढळते. परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो. पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी माणूस! या मृत्यूच्या शरीरापासून मला कोण सोडवेल? परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात. मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात मी पापाच्या नियमाचा दास आहे.

रोमकरांस पत्र 7:7-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे? कधीच नाही! तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. “लोभ धरू नकोस,” असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता; कारण नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे. मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हायचा तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले. तरीपण नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे. तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? कधीच नाही! पाप ते पापच दिसावे, म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते माझ्या ठायी मरण घडवणारे असे झाले, आणि आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे म्हणून असे झाले. कारण आपल्याला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे; मी तर दैहिक, पापाला विकलेला असा आहे. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही; म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करतो. जे मी इच्छीत नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते. कारण मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते. तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

रोमकरांस पत्र 7:7-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तर मग नियमशास्त्र म्हणजेच पाप असे आपण म्हणावे काय? मुळीच नाही! तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. लोभ धरू नको, असे नियमशास्त्रात सांगितले नसते, तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. परंतु पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्यायोगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला. नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे. पूर्वी मी नियमशास्त्राविरहित जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावयाचा तिचाच परिणाम माझ्या बाबतीत मरण झाला, असे माझ्या अनुभवास आले. कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले. तर मग नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, न्याय्य व चांगली आहे. म्हणजे जे चांगले आहे, त्याने मला मरण आणले काय? कदापि नाही! हे पापाने केले. पाप ते पापच दिसावे, म्हणून जे चांगले आहे, त्याच्या योगे पाप माझ्या मध्ये मरण घडवणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पापाचे खरे स्वरूप प्रकट व्हावे म्हणून असे झाले. आपणाला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी मात्र मर्त्य मानव असून पापाला गुलाम म्हणून विकलेला आहे, मी काय करतो, ते माझे मलाच कळत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर ज्याचा मला द्वेष वाटतो ते करतो. जे मी इच्छीत नाही, ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो. तर आता ह्यापुढे ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते. मला ठाऊक आहे की, माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते, ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही, असे जे वाईट, ते मी करतो. आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते. सत्कृत्य करण्याची इच्छा असतानाही मी मात्र दुष्कृत्याची निवड करतो, हा नियम मला माझ्यामध्ये आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो. परंतु माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देव हे करतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तर मग माझी अवस्था ही अशी आहे: मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.