रोमकरांस पत्र 3:1-8
रोमकरांस पत्र 3:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ? सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती. पण काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय? कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’ पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.) कधीच नाही! असे झाले तर, देव जगाचा न्याय कसा करील? कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा? आणि आपण चांगले घडावे म्हणून वाईट करू या असे का म्हणून नये? आम्ही असे सांगत असतो अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे, अशा लोकांची त्यांना यथान्याय शिक्षा आहे.
रोमकरांस पत्र 3:1-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का? सर्व बाबतीत आहे! सर्वात प्रथम यहूदीयांना परमेश्वराने आपले वचन सोपवून दिले होते. जर काहीजण अविश्वासू होते तर मग काय? त्यांचा अविश्वासूपणा हा परमेश्वराच्या विश्वासूपणाला रद्द करेल का? नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे: “हे सारे तू पाहिले आहेस आणि म्हणून माझ्याविरुद्ध तू दिलेला निकाल यथान्याय आहे.” परंतु जर आमच्या अनीतिमुळे परमेश्वराचे नीतिमत्व अधिक स्पष्ट होत असेल तर आम्ही काय म्हणावे? परमेश्वर आपल्यावर क्रोध आणतात तर ते अन्यायी आहे का? (मी तर हे मानवी रीतीने बोलतो.) पण असे कदापि नाही! कारण मग परमेश्वर जगाचा न्याय कसा करतील? कोणी असा वाद करेल, “जर माझ्या खोटेपणाने परमेश्वराच्या खरेपणाचे संवर्धन होते व त्यांचे अधिक गौरव होते, तर मी पापी आहे असा दोष का लावण्यात येत आहे?” किंवा, “चला आपण वाईट करू म्हणजे यामधून काही चांगले निष्पन्न होईल” आम्ही असेच म्हणालो, असा काहीजण आमच्यावर आरोप लावतात. त्यांची दंडाज्ञा तर योग्यच आहे!
रोमकरांस पत्र 3:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग यहूदी असण्यात फायदा तो काय? अथवा सुंतेपासून झालेला लाभ तो कोणता? सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती. कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही! देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो; शास्त्रातही लिहिलेले आहे की, “तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.” पण आपल्या अनीतीमुळे जर देवाचे नीतिमत्त्व स्थापित होते, तर ह्यावरून आपण काय म्हणावे? देव जो क्रोधाने शासन करतो तो अनीतिमान आहे, असे म्हणावे की काय? (मी हे मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.) कधीच नाही! असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील? तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मीही शिक्षेस पात्र का ठरावे? आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? — आम्ही असेच म्हणतो असा कित्येक लोक आमच्यावर आळ घेतात — अशा लोकांची दंडाज्ञा यथान्याय आहे.
रोमकरांस पत्र 3:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग यहुदी असण्यात लाभ तो काय? अथवा सुंतेचे महत्त्व ते काय? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही! प्रत्येक मनुष्य जरी खोटा ठरला तरीही देव खरा ठरेल! धर्मशास्त्रातही लिहिलेले आहे: तू आपल्या शद्बांत नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा. पण आपल्या अनीतीमुळे जर देवाचे नीतिमत्व स्थापन केले जाते, तर ह्याला आपण काय म्हणावे? देव जो क्रोधाने शासन करतो तो अनीतिमान आहे, असे म्हणावे की काय? (मी हे मानवी व्यवहारानुसार बोलत आहे.) कधीच नाही! असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करू शकेल? परंतु माझ्या असत्यावरून देवाची सत्यता त्याच्या गौरवासाठी समृद्ध होत असल्याचे दिसून आले, तर एखाद्या पापी माणसाप्रमाणे मला शिक्षेस पात्र का ठरविण्यात यावे? बरे ते घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो, असा कित्येक लोक आमच्यांवर निंदाजनक आरोप करतात. अशा लोकांना दोषी ठरविण्यात येईल व ते यथायोग्यच असेल.