YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 3

3
आक्षेपांचे खंडन
1तर मग यहुदी असण्यात लाभ तो काय? अथवा सुंतेचे महत्त्व ते काय? 2सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. 3काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? 4कधीच नाही! प्रत्येक मनुष्य जरी खोटा ठरला तरीही देव खरा ठरेल! धर्मशास्त्रातही लिहिलेले आहे:
तू आपल्या शद्बांत नीतिमान ठरावे
आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.
5पण आपल्या अनीतीमुळे जर देवाचे नीतिमत्व स्थापन केले जाते, तर ह्याला आपण काय म्हणावे? देव जो क्रोधाने शासन करतो तो अनीतिमान आहे, असे म्हणावे की काय? (मी हे मानवी व्यवहारानुसार बोलत आहे.) 6कधीच नाही! असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करू शकेल? 7परंतु माझ्या असत्यावरून देवाची सत्यता त्याच्या गौरवासाठी समृद्ध होत असल्याचे दिसून आले, तर एखाद्या पापी माणसाप्रमाणे मला शिक्षेस पात्र का ठरविण्यात यावे? 8बरे ते घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो, असा कित्येक लोक आमच्यांवर निंदाजनक आरोप करतात. अशा लोकांना दोषी ठरविण्यात येईल व ते यथायोग्यच असेल.
नीतिमान कोणीही नाही
9तर मग काय? आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहुदी व यहुदीतर हे सर्व पापाच्या प्रभावाखाली आले आहेत, हे मी अगोदरच दाखवून दिले आहे.
10धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे:
नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही.
11सुज्ञ कोणी नाही, देवाचा शोध झटून घेणारा कोणी नाही.
12सर्व बहकले आहेत,
ते सारे चुकले आहेत,
सत्कर्म करणारा असा कोणी नाही,
एकही नाही.
13त्यांचे घसे उघड्या कबरीसारखे आहेत,
त्यांच्या जिभा ते फसवण्याकरता वापरतात.
त्यांच्या ओठांखाली सापांचे विष आहे.
14त्यांचे तोंड शापाने व कटुतेने भरलेले आहे.
15त्यांचे पाय रक्तपात करण्यासाठी उतावळे झाले आहेत.
16विध्वंस व विपत्ती हा त्यांचा मार्ग आहे.
17शांतीचा मार्ग त्यांनी ओळखून घेतला नाही.
18देवाचे भय त्यांना ठाऊक नाही.
19आपणाला ठाऊक आहे की, प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर जबाबदार धरण्यात यावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते धर्मशास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. 20नियमशास्त्रातील कृत्यांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.
ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे नीतिमत्वाची प्राप्ती
21मात्र आता पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित करण्याची देवाची पद्धत नियमशास्त्राविना अमलात आणली जात आहे आणि तिला नियमशास्त्राचा व संदेष्ट्यांचा दुजोरा आहे. 22ही देवाची पद्धत सर्वांसाठी त्यांच्या येशू ख्रिस्तावरील श्रद्धेवर आधारित आहे. ह्या बाबतीत भेदभाव नाही, 23कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत. 24देवाच्या कृपेने एक दान म्हणून सर्व लोक ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे देवाबरोबर नीतिमान ठरले आहेत. 25-26त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.
27तर मग फुशारकीचे काय? तिला तर मुळीच वाव नाही. कोणत्या नियमाने? कृत्यांनी काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. 28कारण नियमशास्त्रातील कृत्यांवाचून मनुष्य विश्वासाने देवाबरोबरचे आपले संबंध यथोचित करू शकतो, असे आपण मानतो. 29किंवा देव केवळ यहुदी लोकांचा आहे काय? तो यहुदीतरांचाही नव्हे काय? हो, आहे. 30देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व सुंता न झालेल्यांना तशाच विश्वासाद्वारे नीतिमान ठरवील, तर तो यहुदीतरांचाही देव आहे. 31तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्र रद्दबातल करतो काय? कधीच नाही! उलट आपण नियमशास्त्र उचलून धरतो.

सध्या निवडलेले:

रोमकरांना 3: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन