रोमकरांस पत्र 12:3-10
रोमकरांस पत्र 12:3-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे. कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत. पण आपल्याला पुरविलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत; जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत; सेवा असेल, तर सेवा करण्यात तत्पर रहावे; जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात, किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी. प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा. बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे
रोमकरांस पत्र 12:3-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला दिलेल्या कृपेने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो: स्वतःला वाजवीपेक्षा अधिक समजू नका, तर आपणास परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला माना. आपल्या प्रत्येकाला एक शरीर असून अनेक अवयव आहेत, आणि हे सर्व अवयव एकच कार्य करीत नाहीत. आपण ख्रिस्तामध्ये अनेक असलो, तरी एक शरीर आहोत व आपण सर्व एकमेकांचे अवयव आहोत. आपल्या सर्वांना जी कृपा दिली आहे, त्यानुसार आपल्याला वेगवेगळी दाने दिली आहेत. जर तुम्हाला परमेश्वराचे संदेश सांगण्याचे कृपादान असेल, तर तो संदेश आपल्या विश्वासानुसार सांगा. जर सेवा करण्याचे, तर सेवा करा. जर शिकविण्याचे, तर शिकवा. जर उत्तेजनाचे, तर उत्तेजन द्या; जर देण्याचे असेल, तर औदार्याने द्या; जर व्यवस्थापनाचे असेल, तर आस्थेने करा; जर करुणा करण्याचे, तर उल्हासाने करा. प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा. एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.
रोमकरांस पत्र 12:3-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा; सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणार्याने शिक्षण देण्यात, बोध करणार्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्याने ती संतोषाने करावी. प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्याला चिकटून राहा; बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.
रोमकरांस पत्र 12:3-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःचे मूल्यमापन करा. जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत व त्या सर्व अवयवांची कामे निरनिराळी आहेत, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेनुसार आपल्याला विविध कृपादाने मिळाली आहेत. आपल्या विश्वासाच्या प्रमाणात संदेश देणाऱ्याने संदेश देण्यात, सेवा करणाऱ्याने सेवा करण्यात, शिक्षण देणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात ही कृपादाने वापरावीत. देणाऱ्याने औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम दक्षतेने करावे व दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना