YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 10:1-15

रोमकरांस पत्र 10:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधुजनहो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की, त्यांचे तारण व्हावे. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत. कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. कारण मोशे असे लिहितो, “जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरतो तो तेणेकरून वाचेल.” परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व म्हणते, “तू आपल्या मनात म्हणू नकोस की, उर्ध्वलोकी कोण चढेल?” (अर्थात ख्रिस्ताला खाली आणण्यास). किंवा “अधोलोकी कोण उतरेल?” (अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणण्यास). तर ते काय म्हणते? “ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे”; (आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत) ते हेच आहे की, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंत:करणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.1 कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजीत होणार नाही.’ यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे. कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्‍यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्‍यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे.

रोमकरांस पत्र 10:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे. कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही. कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत. कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे. कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’ पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणू नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास) किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास) पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे. कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’ यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे, ‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’ मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील? आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’

रोमकरांस पत्र 10:1-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

बंधुंनो व भगिनींनो, माझी मनापासून इच्छा व परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की इस्राएल लोकांचे तारण व्हावे. ते परमेश्वराप्रती आवेशी आहेत, हे मला ठाऊक आहे, परंतु तो आवेश ज्ञानावर आधारित नाही, याबद्दल मी साक्ष देतो. परमेश्वराच्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहीत नाही. ते परमेश्वराच्या नीतिमत्वाच्या अधीन न होता, त्यांनी स्वतःचे नीतिमत्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले. कारण ख्रिस्त नियमशास्त्रांची परिपूर्ती आहे, यासाठी की विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त व्हावे. नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्वासंबंधी मोशेने अशा रीतीने लिहिले: “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.” पण विश्वासाने मिळणारे नीतिमत्व सांगते: “असे आपल्या मनात म्हणू नका की, ‘ख्रिस्ताला खाली आणण्यासाठी स्वर्गात कोण चढेल?’ किंवा, ‘ख्रिस्ताला मेलेल्यामधून वर आणण्यासाठी कोण पाताळात खाली उतरेल?’ ” याचा अर्थ काय आहे? “हे वचन तुमच्याजवळ आहे; ते तुमच्या मुखात व हृदयात आहे,” हा विश्वासाचा संदेश आम्ही गाजवितो: “येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल. कारण तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवल्यानेच तुम्ही नीतिमान ठरता; आणि आपल्या मुखाने इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगितले की तारण होते. शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.” यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात, परंतु, “जो कोणी प्रभुच्या नावाने त्यांचा धावा करील तोच वाचेल.” ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेविला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील? आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: “शुभवार्ता सांगणार्‍यांचे पाय किती मनोरम आहेत!”

रोमकरांस पत्र 10:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बंधुजनहो, माझ्या इस्राएली लोकांचे तारण व्हावे ही माझी मनीषा व देवाजवळ विनंती आहे. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापन करू पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाचा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ख्रिस्ताने नियमशास्त्राची परिपूर्ती केली आहे. मोशे नीतिमत्वाविषयी असे लिहितो, ‘जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरणात आणतो, तो त्यामुळे वाचेल.’ परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, ‘तू आपल्या मनात म्हणू नकोस की, ख्रिस्ताला खाली आणायला उर्ध्वलोकी कोण चढेल किंवा ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणायला अधोलोकी कोण उतरेल?’. तर ते नीतिमत्व काय म्हणते? ‘देवाचा शद्ब तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे,’ आमच्या विश्वासाचा विषय असलेला तो शद्ब आम्ही जगजाहीर करीत आहोत, तो हाच, कारण येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो, तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो, त्याचे तारण होते; कारण धर्मशास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही.’ यहुदी व ग्रीक ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात, त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे. ‘जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचे तारण होईल.’ मात्र ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? ‘शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती सुंदर असतात!’ असा धर्मशास्त्रलेख आहे.