बंधुंनो व भगिनींनो, माझी मनापासून इच्छा व परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की इस्राएल लोकांचे तारण व्हावे. ते परमेश्वराप्रती आवेशी आहेत, हे मला ठाऊक आहे, परंतु तो आवेश ज्ञानावर आधारित नाही, याबद्दल मी साक्ष देतो. परमेश्वराच्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहीत नाही. ते परमेश्वराच्या नीतिमत्वाच्या अधीन न होता, त्यांनी स्वतःचे नीतिमत्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले. कारण ख्रिस्त नियमशास्त्रांची परिपूर्ती आहे, यासाठी की विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त व्हावे. नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्वासंबंधी मोशेने अशा रीतीने लिहिले: “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.” पण विश्वासाने मिळणारे नीतिमत्व सांगते: “असे आपल्या मनात म्हणू नका की, ‘ख्रिस्ताला खाली आणण्यासाठी स्वर्गात कोण चढेल?’ किंवा, ‘ख्रिस्ताला मेलेल्यामधून वर आणण्यासाठी कोण पाताळात खाली उतरेल?’ ” याचा अर्थ काय आहे? “हे वचन तुमच्याजवळ आहे; ते तुमच्या मुखात व हृदयात आहे,” हा विश्वासाचा संदेश आम्ही गाजवितो: “येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल. कारण तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवल्यानेच तुम्ही नीतिमान ठरता; आणि आपल्या मुखाने इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगितले की तारण होते. शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.” यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात, परंतु, “जो कोणी प्रभुच्या नावाने त्यांचा धावा करील तोच वाचेल.” ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेविला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील? आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: “शुभवार्ता सांगणार्यांचे पाय किती मनोरम आहेत!”
रोमकरांस 10 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस 10:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ