YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 1:20-25

रोमकरांस पत्र 1:20-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले; आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले; असे की, त्यांच्या देहांची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली; तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन.

रोमकरांस पत्र 1:20-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले. स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य, तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली. म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवानेदेखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले. त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन.

रोमकरांस पत्र 1:20-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कसलेही सबब राहिले नाही. परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली. ते स्वतःला शहाणे समजत असताना, मूर्ख बनले आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, रागंणारे प्राणी यांची मूर्ती बनविली. याकरिता परमेश्वरानेही त्यांना हृदयाच्या पापी वासना व सर्वप्रकारच्या लैंगिक अनाचारांच्या अधीन होऊ दिले आणि त्यांनी आपल्या शरीराची आपसात मानहानी केली. परमेश्वराविषयीच्या सत्याची अदलाबदल त्यांनी खोटेपणाशी केली, आणि ते उत्पन्नकर्त्या ऐवजी उत्पन्न केलेल्या वस्तुंची उपासना व सेवा केली, तो उत्पन्नकर्ता युगानुयुग धन्यवादित आहेत. आमेन.

रोमकरांस पत्र 1:20-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे शाश्वत सामर्थ्य व त्याचा दिव्य स्वभाव ही निर्मिलेल्या वस्तूंवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये! देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. अविनाशी देवाच्या उपासनेऐवजी त्यांनी मर्त्य मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांची उपासना केली. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. असे की, त्यांच्या देहाची त्यांच्या त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या सत्याची लबाडीबरोबर अदलाबदल केली आणि ज्याचा युगानुयुगे गौरव केला जावा त्या निर्माणकर्त्याऐवजी निर्मित गोष्टींची आराधना व सेवा केली.

रोमकरांस पत्र 1:20-25

रोमकरांस पत्र 1:20-25 MARVBSIरोमकरांस पत्र 1:20-25 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा