YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 1:17-23

रोमकरांस पत्र 1:17-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते कारण असा शास्त्रलेख आहे की, “नीतिमान विश्वासाने जगेल.” वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले. स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य, तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली.

रोमकरांस पत्र 1:17-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

या शुभवार्तेमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व प्रकट होते व हे नीतिमत्व विश्वासाने प्रथमपासून शेवटपर्यंत विश्वासाद्वारे साध्य होते, कारण असे लिहिले आहे, “नीतिमान विश्वासाने जगेल.” जे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्या सर्व अधार्मिक आणि दुष्कर्म करणार्‍या लोकांवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो, परमेश्वराविषयी जे कळले पाहिजे ते त्यांना प्रकट झाले आहे; स्वतः परमेश्वरानेच त्यांना ते प्रकट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही. परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली. ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या.

रोमकरांस पत्र 1:17-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले; आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली.

रोमकरांस पत्र 1:17-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यात परमेश्वर स्वतःबरोबरचे माणसाचे संबंध कसे यथोचित करतो, ते दाखविले आहे. ते सुरुवातीपासून श्रद्धेने होत असते. धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’ जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधार्मिकपणावर व दुष्टपणावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट झाला आहे. परमेश्वर त्यांना शिक्षा करतो, कारण देवाविषयी मिळविता येण्यासारखे ज्ञान त्यांना स्पष्ट दिसून येते; देवाने स्वतः ते त्यांना दाखवून दिले आहे. सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे शाश्वत सामर्थ्य व त्याचा दिव्य स्वभाव ही निर्मिलेल्या वस्तूंवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये! देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. अविनाशी देवाच्या उपासनेऐवजी त्यांनी मर्त्य मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांची उपासना केली.

रोमकरांस पत्र 1:17-23

रोमकरांस पत्र 1:17-23 MARVBSIरोमकरांस पत्र 1:17-23 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा