YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 6:1-17

प्रकटी 6:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले आणि त्या चार प्राण्यातील एकाने मेघगर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना ऐकले. मी एक पांढरा घोडा पाहिला, त्यावर जो बसला होता त्याच्याजवळ धनुष्य होते आणि त्यास मुकुट देण्यात आला. तो जिंकीत विजयावर विजय मिळविण्यास निघाला. जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा दुसऱ्या जिवंत प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. नंतर दुसरा घोडा निघाला, तो अग्निज्वालेप्रमाणे लाल होता. त्यावर जो बसलेला होता त्यास पृथ्वीवरील शांती नाहीशी करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी की, लोकांनी एकमेकास वधावे. त्यास मोठी तलवार देण्यात आली होती. जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तिसऱ्या जिवंत प्राण्याला “ये” असे म्हणतांना ऐकले तेव्हा मी काळा घोडा पाहिला आणि त्यावर जो बसलेला होता त्याच्या हातात तराजू होते. मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस. कोकऱ्याने जेव्हा चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याची वाणी “ये” म्हणताना ऐकली. नंतर मी फिकट रंगाचा घोडा पाहिला. त्यावर जो बसलेला होता त्याचे नाव मरण होते; आणि मृतलोक त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, रोगाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून मनुष्यांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला होता. जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस?” तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्यापूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या. त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला; अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले एखाद्या गुंडाळीसारखे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरून ढळून गेली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे, गुहात व डोगरांतील खडकातून लपली; आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि त्याच्यापुढे कोण टिकेल?

सामायिक करा
प्रकटी 6 वाचा

प्रकटी 6:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

कोकर्‍याने त्या सात शिक्यातील पहिला शिक्का फोडून उघडताना मी पाहिले. तेव्हा त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, गर्जनेसारख्या आवाजात म्हटले, “ये!” मी पहिले तो माझ्यासमोर एक पांढरा घोडा आहे असे मला दिसले! घोडेस्वाराजवळ एक धनुष्य होते. त्याच्या डोक्यावर एक मुकुट ठेवण्यात आला. मग विजेता म्हणून जिंकण्याच्या उद्देशाने तो स्वार निघून गेला. नंतर कोकर्‍याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्‍या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली. यावेळी एक अग्निवर्ण घोडा बाहेर पडला. पृथ्वीवरील शांतता नष्ट करण्याचा अधिकार त्याला देण्यात आला होता. लोक एकमेकांचा वध करू लागले. त्या स्वाराला एक मोठी तलवार देण्यात आली. मग कोकर्‍याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा सजीव प्राणी, “ये” म्हणताना मी ऐकले. मग मी एक काळा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराच्या हातात एक तराजू होते. मग त्या चार सजीव प्राण्यांमधून निघालेली एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “एका दिवसाच्या मजुरीत एक कि.ग्रॅ. गहू आणि तीन कि.ग्रॅ. जव! आणि तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नका.” जेव्हा कोकर्‍याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा मी ऐकले, चौथा सजीव प्राणी म्हणाला, “ये!” मग मी एक फिकट रंगाचा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराचे नाव मृत्यू होते आणि अधोलोक त्याच्यामागून आला. पृथ्वीवरील एक चतुर्थांश लोकांना युद्ध, दुष्काळ, पीडा आणि हिंस्र पशूद्वारे ठार मारण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला होता. त्यानंतर त्याने पाचवा शिक्का फोडला, तेव्हा मी एक वेदी पाहिली. त्या वेदीखाली परमेश्वराचे वचन सांगितल्यामुळे आणि विश्वासूपणे साक्ष दिल्यामुळे जिवे मारले गेलेल्या सर्व लोकांचे आत्मे होते. त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्यास तुम्ही किती काळ लावणार?” तेव्हा त्यातील प्रत्येकाला एकएक पांढरा झगा देण्यात आला. त्यांना सांगण्यात आले की त्यांचे सहकर्मी बंधू, हुतात्म्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत, आणखी थोडा काळ थांबा. मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमिकंप झाला. सूर्य शेळ्याच्या केसांपासून तयार केलेल्या गोणपाटासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला. अंजिराच्या वृक्षांवरील कच्ची फळे एखाद्या प्रचंड वादळाने गळून पडतात, तसे आभाळातील तारे भूमीवर गळून पडतांना मला दिसले. एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले. तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सर्वजण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले. ते डोंगरटेकड्यांना उद्देशून ओरडून विनवू लागले, “आम्हावर पडून जे राजासनावर बसले आहेत, त्यांच्या नजरेपासून आणि कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा! कारण त्यांच्या क्रोधाचा महान दिवस आला आहे, त्यात कोणाचा निभाव लागेल?”

सामायिक करा
प्रकटी 6 वाचा

प्रकटी 6:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग कोकर्‍याने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये,”2 असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!” त्याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथा प्राणी, “ये,” असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा ‘घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव ‘मृत्यू’; आणि ‘अधोलोक’ त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना ‘तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला. त्याने पाचवा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले; ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?” तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला; ‘अंजिराचे झाड’ मोठ्या वार्‍याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे ‘आकाशातील तारे’ पृथ्वीवर ‘पडले.’ ‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली. ‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी’, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, ‘गुहांत’ व डोंगरांतील ‘खडकांतून लपली;’ आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टीपुढून व कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हांला ‘लपवा.’ कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’

सामायिक करा
प्रकटी 6 वाचा

प्रकटी 6:1-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यानंतर कोकराने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये!” असे म्हणाला, ते मी ऐकले. मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. त्यानंतर त्याला मुकुट देण्यात आला. तो विजयी योद्धा म्हणून विजयावर विजय मिळवण्यास निघाला. नंतर त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. त्या वेळी दुसरा घोडा निघाला. तो तांबूस रंगाचा होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवर युद्ध करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला महान तलवार देण्यात आली होती. मग त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते. त्या वेळी जणू काही चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी: “दिवसाची मजुरी किलोभर गहू आणि दिवसाची मजुरी तीन किलो जव. मात्र ऑलिव्ह तेल व द्राक्षरस ह्यांची नासाडी करू नकोस.” नंतर कोकराने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर तलवारीने, दुष्काळाने, रोगराईने व पृथ्वीवरील हिंस्र श्वापदांकडून माणसांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला. त्यानंतर कोकराने पाचवा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे वधलेल्या लोकांचे होते. ते जोरात ओरडून म्हणाले, “हे सार्वभौम प्रभो, तू पवित्र व सत्य आहेस. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांचा न्यायनिवाडा तू कोठपर्यंत करणार नाहीस आणि त्यांचा आमच्या रक्ताबद्दल सूड घेणार नाहीस?” तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले, “तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे ठार मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.” कोकराने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा भीषण स्वरूपाचा भूकंप झाला. सूर्य केसांच्या गोणपाटासारखा काळा झाला व पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला. अंजिराचे झाड वादळी वाऱ्यात सापडले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात, तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादी गुंडाळी गुंडाळावी तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि प्रत्येक डोंगर व बेट आपापल्या ठिकाणांवरून ढळले. तेव्हा पृथ्वीवरील राजे, राज्यकर्ते व सैन्याधिकारी, श्रीमंत व प्रभावशाली लोक, इतर सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, गुहांत व डोंगरांतील खडकांखाली लपली आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टिपुढून व कोकराच्या क्रोधापासून आम्हांला लपवा. कारण त्यांच्या क्रोधाचा भयंकर दिवस आला आहे, त्याच्यापुढे कोणाच्याने टिकाव धरवेल?”

सामायिक करा
प्रकटी 6 वाचा