YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 6:1-17

प्रकटी 6:1-17 MACLBSI

त्यानंतर कोकराने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये!” असे म्हणाला, ते मी ऐकले. मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. त्यानंतर त्याला मुकुट देण्यात आला. तो विजयी योद्धा म्हणून विजयावर विजय मिळवण्यास निघाला. नंतर त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. त्या वेळी दुसरा घोडा निघाला. तो तांबूस रंगाचा होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवर युद्ध करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला महान तलवार देण्यात आली होती. मग त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते. त्या वेळी जणू काही चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी: “दिवसाची मजुरी किलोभर गहू आणि दिवसाची मजुरी तीन किलो जव. मात्र ऑलिव्ह तेल व द्राक्षरस ह्यांची नासाडी करू नकोस.” नंतर कोकराने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर तलवारीने, दुष्काळाने, रोगराईने व पृथ्वीवरील हिंस्र श्वापदांकडून माणसांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला. त्यानंतर कोकराने पाचवा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे वधलेल्या लोकांचे होते. ते जोरात ओरडून म्हणाले, “हे सार्वभौम प्रभो, तू पवित्र व सत्य आहेस. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांचा न्यायनिवाडा तू कोठपर्यंत करणार नाहीस आणि त्यांचा आमच्या रक्ताबद्दल सूड घेणार नाहीस?” तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले, “तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे ठार मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.” कोकराने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा भीषण स्वरूपाचा भूकंप झाला. सूर्य केसांच्या गोणपाटासारखा काळा झाला व पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला. अंजिराचे झाड वादळी वाऱ्यात सापडले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात, तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादी गुंडाळी गुंडाळावी तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि प्रत्येक डोंगर व बेट आपापल्या ठिकाणांवरून ढळले. तेव्हा पृथ्वीवरील राजे, राज्यकर्ते व सैन्याधिकारी, श्रीमंत व प्रभावशाली लोक, इतर सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, गुहांत व डोंगरांतील खडकांखाली लपली आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टिपुढून व कोकराच्या क्रोधापासून आम्हांला लपवा. कारण त्यांच्या क्रोधाचा भयंकर दिवस आला आहे, त्याच्यापुढे कोणाच्याने टिकाव धरवेल?”