YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 15:1-8

प्रकटी 15:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या, असे सात देवदूत मी पाहिले त्या शेवटल्या पीडा होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता. मग मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाने दिलेली वीणा घेऊन उभे होते. देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते. सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत. हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस; कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत. नंतर मी बघितले आणि साक्षीच्या मंडपाचे परमेश्वराचे स्वर्गातील भवन उघडले गेले. आणि त्या भवनातून सात देवदूत बाहेर आले; त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. त्यांनी स्वच्छ, शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते. तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला, त्याने परमपवित्रस्थान भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत कोणीही आत जाऊ शकला नाही.

सामायिक करा
प्रकटी 15 वाचा

प्रकटी 15:1-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिलेः अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला. मग माझ्यासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मी पाहिले. पहिला पशू, त्याची मूर्ती, त्याची खूण व त्याच्या नावाची संख्या, या सर्वांवर विजय संपादन केलेले सर्वजण, काचेच्या समुद्राच्या किनारीवर उभे होते. सर्वांच्या हातात परमेश्वराने दिलेल्या वीणा होत्या. ते परमेश्वराचा सेवक मोशे याचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत! हे प्रभू, तुमचे भय धरणार नाही, आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही, असा कोण आहे? कारण तुम्हीच पवित्र आहा! सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, कारण तुमची न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.” मग मी पाहिले, तो स्वर्गातील मंदिराचे साक्षीचे परमपवित्रस्थान उघडलेले मला दिसले. ज्यांना पृथ्वीवर सात पीडा ओतण्याचे काम नेमून देण्यात आले होते, ते सात देवदूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्यांनी डागविरहीत आणि तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केली होती; त्यांच्या छातीवर सोन्याचे पट्टे बांधले होते. त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, त्या सात देवदूतांना युगानुयुग जिवंत असणार्‍या परमेश्वराच्या क्रोधाने भरलेली सात सोन्याची पात्रे दिली. त्यांचे गौरव व सामर्थ्य यांतून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले. सात देवदूतांचे सात पीडा ओतण्याचे काम संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.

सामायिक करा
प्रकटी 15 वाचा

प्रकटी 15:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर मी अत्यंत आश्‍चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले; त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले; श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातांत देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’ ‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’ नंतर मी पाहिले, तेव्हा ‘साक्षीच्या मंडपाचे’ ‘स्वर्गातील मंदिर’ उघडले; आणि स्वच्छ व तेजस्वी ‘तागाची वस्त्रे परिधान केलेले’ व छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे, ‘सात पीडा’ घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले. त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणार्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांना दिल्या. तेव्हा देवाचे ‘तेज’ व पराक्रम ह्यांपासून निघालेल्या ‘धुराने मंदिर भरून गेले;’ आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ संपेपर्यंत ‘कोणालाही मंदिरात जाता आले नाही.’

सामायिक करा
प्रकटी 15 वाचा

प्रकटी 15:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यानंतर मी अत्यंत रहस्यमय, थक्क करणारे व भव्य असे दुसरे एक दृश्य स्वर्गात पाहिले. सात साथीचे रोग आणणारे सात देवदूत दृष्टीस पडले. ते रोग शेवटचे होते, कारण देवाच्या क्रोधाची ती अंतिम अभिव्यक्ती होती. मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक हातात देवाने दिलेल्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकराचे गीत गाताना म्हणत होते: “हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये किती थोर व आश्चर्यकारक आहेत! हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग न्याय्य व सत्य आहेत. हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? तूच एकमेव पवित्र आहेस. सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुझी आराधना करतील, कारण तुझी न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.” नंतर मी पाहिले, तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीच्या मंडपामध्ये असलेले स्वर्गातील मंदिर उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व छातीवर सोन्याचे पट्टे बांधलेले असे, सात पीडा घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले. त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुगे जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांस दिल्या. तेव्हा देवाचे वैभव व सामर्थ्य ह्यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.

सामायिक करा
प्रकटी 15 वाचा