YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 15

15
सात पीडा घेऊन सात देवदूत
1आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिलेः अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला. 2मग माझ्यासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मी पाहिले. पहिला पशू, त्याची मूर्ती, त्याची खूण व त्याच्या नावाची संख्या, या सर्वांवर विजय संपादन केलेले सर्वजण, काचेच्या समुद्राच्या किनारीवर उभे होते. सर्वांच्या हातात परमेश्वराने दिलेल्या वीणा होत्या. 3ते परमेश्वराचा सेवक मोशे याचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते:
“हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा!
तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत!
हे राष्ट्रांच्या राजा,
तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!
4हे प्रभू, तुमचे भय धरणार नाही,
आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही, असा कोण आहे?
कारण तुम्हीच पवित्र आहा!
सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील,
कारण तुमची न्याय्य कृत्ये
प्रकट झाली आहेत.”
5मग मी पाहिले, तो स्वर्गातील मंदिराचे साक्षीचे परमपवित्रस्थान उघडलेले मला दिसले. 6ज्यांना पृथ्वीवर सात पीडा ओतण्याचे काम नेमून देण्यात आले होते, ते सात देवदूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्यांनी डागविरहीत आणि तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केली होती; त्यांच्या छातीवर सोन्याचे पट्टे बांधले होते. 7त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, त्या सात देवदूतांना युगानुयुग जिवंत असणार्‍या परमेश्वराच्या क्रोधाने भरलेली सात सोन्याची पात्रे दिली. 8त्यांचे गौरव व सामर्थ्य यांतून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले. सात देवदूतांचे सात पीडा ओतण्याचे काम संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.

सध्या निवडलेले:

प्रकटीकरण 15: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन