YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 1:9-19

प्रकटी 1:9-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व सहनशीलता ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो. मी प्रभूच्या दिवशी आत्म्यात होतो. माझ्यामागे मी कर्ण्याच्या आवाजासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, “तू जो या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदीकिया या सात शहरातील मंडळ्यांना पाठव.” माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी पाहण्यासाठी मी मागे वळलो, मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा व लांब पायघोळ झगा घातलेला, छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला, असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते; त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तलवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता. मी त्यास पाहिले तेव्हा मी मरण पावल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत. म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस, ज्या घडत आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्याही लिही.

सामायिक करा
प्रकटी 1 वाचा

प्रकटी 1:9-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला. तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.” माझ्याशी कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, आणि जेव्हा मी मागे वळलो तेव्हा तिथे सोन्याच्या सात समया असल्याचे मला दिसले. त्या समयांच्या मध्यभागी मानवपुत्रासारखा दिसणारा कोणी एक उभा होता. त्यांनी पायघोळ वस्त्र घातले होते व छातीवर सोन्याचा पट्टा बांधला होता. त्यांच्या डोक्यावरील केस पांढर्‍या लोकरीसमान, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्यांचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे भेदक होते. त्यांचे पाय जणू काही भट्टीतून शुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्यांची वाणी गर्जना करणार्‍या धबधब्यासारखी होती. त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता. त्यांना पाहताक्षणीच मी त्यांच्या पायाशी मृतवत होऊन पडलो. पण त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेऊन म्हटले, “भिऊ नको! मी पहिला व शेवटचा, जिवंत असलेला तो मीच आहे; मी मृत होतो आणि पाहा, आता मी सदासर्वकाळ जिवंत आहे! आणि मृत्यूच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. “तर तू जे पाहिले, जे आता आहे आणि यानंतर घडणार आहे, ते सर्व लिहून ठेव.

सामायिक करा
प्रकटी 1 वाचा

प्रकटी 1:9-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्यांकरता पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.” माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया, आणि त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला,’ आणि छातीवरून ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’ असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; ‘त्याचे डोके’ व ‘केस बर्फासारख्या पांढर्‍या लोकरीसारखे,’ पांढरे होते; ‘त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते,’ ‘त्याचे पाय’ जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत ‘सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.’ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा ‘परमतेजाने’ प्रकाशणार्‍या ‘सूर्यासारखी’ होती. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस; जो पहिला व शेवटला, आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव

सामायिक करा
प्रकटी 1 वाचा

प्रकटी 1:9-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

देवराज्याचे नागरिक म्हणून तुम्ही जो छळ धीराने सहन करीत आहात, त्या छळात मी, तुमचा बंधू योहान, येशूचा अनुयायी म्हणून सहभागी आहे. देवाचा शब्द व येशूने प्रकट केलेले सत्य जाहीर केल्याबद्दल मला पात्म बेटावर ठेवण्यात आले होते. प्रभूच्या दिवशी मी पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली आलो, तेव्हा मला कर्ण्याच्या नादासारखी जोरदार वाणी ऐकू आली. ती वाणी म्हणाली, “तुला जे दिसते, ते लिहून काढ आणि ते पुस्तक इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात ख्रिस्तमंडळ्यांना पाठव.” माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची, हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ झगा परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे केस पांढऱ्या लोकरीसमान किंवा बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काही भट्टीतून विशुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्याची वाणी गर्जना करणाऱ्या धबधब्यासारखी होती. त्याने त्याच्या उजव्या हातात सात तारे धरले होते, आणि त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्याचा चेहरा मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतका तेजस्वी होता. मी त्याला पाहिले, तेव्हा मी त्याच्या पायाजवळ मृतप्राय अवस्थेत पडलो. त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस! जो पहिला व शेवटचा आणि जो जिवंत आहे तो मी आहे! मी मृत्यू स्वीकारला होता तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. म्हणून जे तू पाहिले म्हणजेच जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव.

सामायिक करा
प्रकटी 1 वाचा