YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 1

1
प्रस्तावना
1ज्यागोष्टी लवकरच निश्चितच घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्यांनी आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहानाला ते कळविले. 2योहानाने जे सर्व पाहिले त्याविषयी साक्ष दिली—ती म्हणजे, परमेश्वराचे वचन आणि येशू ख्रिस्ताची साक्ष. 3जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे.
शुभेच्छा आणि ईशगान
4योहानाकडून,
आशिया प्रांतातील सात मंडळ्यास:
जे आहेत आणि जे होते आणि जे येणार आहेत आणि त्यांच्या सिंहासनासमोर असणाऱ्या सात आत्म्यांपासून तुम्हास कृपा आणि शांती असो 5आणि जे विश्वसनीय साक्षीदार, मृतातील प्रथमफळ आणि पृथ्वीवरील राजांचे शासक आहेत त्या येशू ख्रिस्तापासून तुम्हास कृपा आणि शांती लाभो.
त्यांना, जे आमच्यावर प्रीती करतात आणि ज्यांच्या रक्ताद्वारे आमची पापांपासून सुटका झाली आहे 6आणि ज्या येशूंनी परमेश्वराची व त्यांच्या पित्याची सेवा करण्यासाठी आमची त्यांचे राज्य व याजक म्हणून निवड केली आहे, त्यांना सदासर्वकाळ गौरव व सामर्थ्य असो! आमेन.
7“पाहा, ते मेघारूढ होऊन येत आहेत,”
आणि “प्रत्येक नेत्र त्यांना पाहील,#1:7 दानी 7:13
स्वतः त्याला भोसकणारेही त्यांच्याकडे पाहतील”
आणि तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोक “त्यांच्यामुळे शोक करतील.”#1:7 जख 12:10
असेच होणार! आमेन.
8प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा#1:8 म्हणजे प्रारंभ आणि शेवट, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.”
योहानाचा ख्रिस्ताविषयी दृष्टान्त
9मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो. 10प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला. 11तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.”
12माझ्याशी कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, आणि जेव्हा मी मागे वळलो तेव्हा तिथे सोन्याच्या सात समया असल्याचे मला दिसले. 13त्या समयांच्या मध्यभागी मानवपुत्रासारखा दिसणारा कोणी एक उभा होता. त्यांनी पायघोळ वस्त्र घातले होते व छातीवर सोन्याचा पट्टा बांधला होता. 14त्यांच्या डोक्यावरील केस पांढर्‍या लोकरीसमान, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्यांचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे भेदक होते. 15त्यांचे पाय जणू काही भट्टीतून शुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्यांची वाणी गर्जना करणार्‍या धबधब्यासारखी होती. 16त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता.
17-18त्यांना पाहताक्षणीच मी त्यांच्या पायाशी मृतवत होऊन पडलो. पण त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेऊन म्हटले, “भिऊ नको! मी पहिला व शेवटचा, जिवंत असलेला तो मीच आहे; मी मृत होतो आणि पाहा, आता मी सदासर्वकाळ जिवंत आहे! आणि मृत्यूच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.
19“तर तू जे पाहिले, जे आता आहे आणि यानंतर घडणार आहे, ते सर्व लिहून ठेव. 20तू माझ्या उजव्या हातात पाहिलेल्या सात तार्‍यांचे व सोन्याच्या सात समयांचे रहस्य हे आहे: हे सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे देवदूत#1:20 किंवा संदेष्टे आणि सोन्याच्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आहेत.”

सध्या निवडलेले:

प्रकटीकरण 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन