स्तोत्रसंहिता 78:40-72
स्तोत्रसंहिता 78:40-72 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु:खी केले. पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले, आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले. त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही, त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते. मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले. त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले. म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना. त्याने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले त्यांनी त्यांना खाऊन टाकले, आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला. त्याने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले. त्याने गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश बर्फाने केला. त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या व त्यांचे कळप विजांच्या हवाली केली. त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले. त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले. त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला; त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले. त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व, हामाच्या तंबूतील त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले. त्याने त्यांना सुखरुप आणि न भीता मार्गदर्शन केले, पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडवून टाकले. आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात, हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले. त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली, आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले. तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली; फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते. कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले. जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला, आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले. त्याने शिलोतले पवित्रस्थान सोडून दिले, ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता. त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली, आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले. त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले, आणि आपल्या वतनावर तो रागावला. अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले, आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत. त्यांचे याजक तलवारीने पडले, आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत. मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला. त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले; त्याने त्यांची कायमची नामुष्की केली. त्याने योसेफाचा तंबू नाकारला, आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही. त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला. उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले. त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले. आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले. दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले, आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.
स्तोत्रसंहिता 78:40-72 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी कितीदा तरी त्यांच्याविरुद्ध बंड केले आणि अरण्यात त्यांना दुःख दिले! पुन्हा आणि पुन्हा त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली; इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला त्यांनी चिथविले. पीडा देणार्यापासून त्यांनी केलेली त्यांची सुटका— त्यांच्या सामर्थ्याचे त्यांनी स्मरण केले नाही, ज्या दिवशी त्यांनी इजिप्तमध्ये आपली चिन्हे प्रदर्शित केली, सोअनाच्या प्रदेशात त्यांनी चमत्कार केले. त्यांनी त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रूपांतर रक्तात केले; त्यामुळे त्यांच्या जलप्रवाहातील पाणी पिता आले नाही. सर्व इजिप्त देश खाऊन टाकण्यासाठी त्यांनी कीटकांचे थवेच्या थवे पाठविले आणि बेडकांनी सर्व विध्वंस करून टाकले. त्यांनी त्यांची पिके सुरवंटांना खावयास दिली; त्यांचा हंगाम टोळांनी फस्त केला. त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि उंबराच्या झाडांचा बर्फाने नाश केला. त्यांनी त्यांची गुरे गारांनी नष्ट केली, विजेने त्यांची मेंढरे ठार झाली. त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग, क्रोध, संताप आणि शत्रुत्व— आणि नाश करणारा देवदूतांचा एक गट सोडला. त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले. इजिप्त देशाच्या प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पुत्रांस त्यांनी ठार केले; जे हामाच्या डेर्यातील पौरुषाचे प्रथमफळ होते. पण त्यांनी आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर आणून, त्यांना वाट दाखवित मेंढरांसारखे रानातून नेले, त्यांनीच त्यांचे सुरक्षित मार्गदर्शन केले, म्हणून ते भयभीत झाले नाहीत; परंतु त्यांच्या शत्रूंना मात्र समुद्रात बुडवून टाकले. त्यांनी आपल्या उजव्या हाताने त्यांना आपल्या पवित्र भूमीच्या सीमेवरील पर्वतीय देशात आणले. त्यांनी राष्ट्रांना त्यांच्या समोरून काढून टाकले आणि त्यांची जमीन त्यांना सूत्राने मापून वतन म्हणून दिली; त्यांनी इस्राएलाच्या गोत्रास त्यांच्या घरात स्थायिक केले. तरी त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली आणि त्यांनी सर्वोच्च परमेश्वराविरुद्ध बंड केले; त्यांच्या आज्ञा पाळण्याचे नाकारले. जसा एक सदोष धनुष्य दुसरीकडे वळतो, ते आपल्या पूर्वजांप्रमाणेच अविश्वासू आणि विश्वासघातकी झाले. त्यांनी त्यांच्या उच्च स्थानांमुळे त्यांचा राग भडकविला; त्यांनी मूर्तींद्वारे त्यांना क्रोधाविष्ट केले. त्यांचे ऐकून परमेश्वराला अत्यंत क्रोध आला, आणि त्यांनी इस्राएलला पूर्णपणे नाकारले. त्यांनी मानवांमध्ये वस्ती केली होती, त्या शिलोह येथील निवासमंडपाचा त्यांनी त्याग केला, त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला, त्यांनी आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले. त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले, वतनावरचा त्यांचा क्रोध अनावर झाला होता. त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले; त्यांच्या कन्यांना विवाहगीते लाभलीच नाही. याजकांचा तलवारीने वध केला आणि त्यांच्या विधवांना रडण्याची संधी मिळालीच नाही. झोपेतून एखादा मनुष्य जागा व्हावा, तसे प्रभू जागे झाले; द्राक्षरसाच्या धुंदीमधून जागे झालेल्या योध्यासारखे ते उठले. त्यांनी आपल्या शत्रूंची दाणादाण केली आणि त्यांची कायमची फजिती केली. परंतु त्यांनी योसेफाचा डेरा वर्ज्य केला; एफ्राईमचे गोत्र पसंत केले नाही. तर त्यांनी यहूदाहचे गोत्र निवडले, त्यांना प्रिय असलेल्या सीयोन पर्वतास त्यांनी आपले पवित्रस्थान अत्युच्च बांधले, आणि पृथ्वीसारखे त्यांनी कायमचे निश्चित केले. त्यांनी आपला सेवक दावीदाची निवड केली, त्यांनी त्याला मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले. मेंढरांची राखण करीत त्यांच्यामागे फिरत असतानाच, त्यांनी आपली प्रजा याकोब अर्थात् आपले वतन इस्राएलाचा मेंढपाळ म्हणून त्याची निवड केली. आणि दावीदाने प्रामाणिक अंतःकरणाने त्यांचे रक्षण केले; कुशल हातांनी त्याने त्यांचे नेतृत्व केले.
स्तोत्रसंहिता 78:40-72 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले! पुनःपुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूला चिडवले. त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यांना स्मरण झाले नाही; त्याने त्यांना शत्रूंपासून सोडवले, त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोअनाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली, तो दिवस त्यांनी आठवला नाही. त्याने त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रक्त केले, म्हणून त्यांचे वाहते पाणी त्यांच्याने पिववेना. त्याने त्यांच्यावर माश्यांचे थवेच्या थवे पाठवले; त्या माश्यांनी त्यांना ग्रासून टाकले; त्याने बेडूक पाठवले, त्या बेडकांनी त्यांचे सर्वकाही नासून टाकले. त्याने त्यांच्या शेतातल्या उत्पन्नावर सुरवंट व त्यांच्या श्रमफलावर टोळ पडू दिले. त्याने गारांनी त्याच्या द्राक्षवेलांचा व बर्फाने त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश केला. त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या, व जनावरे विजांच्या हवाली केली. त्याने त्यांच्यावर आपला कोपाग्नी, क्रोध, रोष व संकट ह्या अनिष्टकारक दूतांची स्वारी सोडली. त्याने आपल्या कोपासाठी मार्ग सिद्ध केला; त्याने त्यांचा जीव मृत्यूपासून वाचवला नाही, तर त्यांचा प्राण मरीच्या हवाली केला. त्याने मिसर देशातले प्रथमजन्मलेले सर्व, हामाच्या डेर्यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथमफल ह्यांना मारले; पण त्याने आपल्या लोकांना मेंढरांसारखे बाहेर आणून त्यांना कळपाप्रमाणे रानातून नेले. त्याने त्यांना सुखरूप नेले, ते भ्याले नाहीत, त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकले. त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे, आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले. त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले. तरी त्यांनी परात्पर देवाची परीक्षा पाहिली व त्याच्याविरुद्ध बंड केले, व त्याचे निर्बंध पाळले नाहीत, तर आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून ते फितूर झाले; फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले. त्यांनी आपल्या उच्च स्थानांमुळे त्याला राग आणला; आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली. हे ऐकून देव कोपला आणि इस्राएलास अगदी कंटाळला; त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला; त्याने आपल्या बलाचा पाडाव होऊ दिला, व आपले वैभव शत्रूच्या हाती पडू दिले. त्याने आपले लोक तलवारीच्या हवाली केले; आपल्या वतनावर तो रुष्ट झाला. अग्नीने त्यांचे कुमार खाऊन टाकले; त्यांच्या कुमारींना लग्नगीते लाभली नाहीत. त्यांचे याजक तलवारीने पडले, व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत. तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणार्या वीरासारखा उठला. त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हटवले; त्यांची कायमची अप्रतिष्ठा केली. त्याने योसेफाचा डेरा वर्ज्य केला, एफ्राइमाचा वंश पसंत केला नाही; तर यहूदाचा वंश त्याने पसंत केला; आपणाला प्रिय जो सीयोन डोंगर तो त्याने पसंत केला. उंच आकाशासारखे व आपण चिरकाल स्थापलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले. त्याने आपला सेवक दावीद ह्याला निवडले; त्याला त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यातून घेतले; आपली प्रजा म्हणजे याकोबवंश, आपले वतन म्हणजे इस्राएलवंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता तेथून त्याने त्यांना आणले. आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले, आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांना मार्ग दाखवला.