YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 78:1-8

स्तोत्रसंहिता 78:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. मी शहाणपणाचे गीत गाईन; मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन. ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या, त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या. त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू. कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले. त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की, त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या. त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या. मग ते आपली आशा देवावर ठेवतील आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत परंतु त्याच्या आज्ञा पाळतील. तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.

स्तोत्रसंहिता 78:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अहो माझ्या लोकांनो, माझे विधिनियम ऐका; माझ्या मुखातून निघणार्‍या वचनाकडे कान द्या. मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन; मी पूर्वकाळचे रहस्य; जुन्या काळातील गुप्त गोष्टी सांगेन; ज्यागोष्टी आम्ही ऐकल्या आणि आम्हाला समजल्या आहे, त्या आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितल्या आहेत. आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे, याहवेहचे गौरव करू आणि त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू. कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली. जेणेकरून येणार्‍या पिढ्या, म्हणजे जन्माला येणारी मुले त्यांना ओळखतील; आणि त्यांनी आपल्या भावी पिढीस त्यांच्याबद्दल कथन करण्यास तयार राहावे. मग ते परमेश्वरावर आपला भरवसा ठेवतील आणि त्यांची कृत्ये विसरणार नाहीत तर त्यांच्या आज्ञा पाळतील. ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील— जे हट्टी व बंडखोर पिढीसारखे होते, ज्यांचे हृदय परमेश्वराशी एकनिष्ठ नव्हते, ज्यांचे आत्मे त्यांच्याशी विश्वासू नव्हते.

स्तोत्रसंहिता 78:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन; प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन. ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या, त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही; तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू. त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापले, त्याने इस्राएलासाठी नियमशास्त्र केले. त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की, त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे, आणि पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणार्‍या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या; त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे. त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्ये विसरू नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात; आणि त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी व बंडखोर स्वभावाची पिढी, आपले अंतःकरण नीट न राखणारी व देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.