स्तोत्रसंहिता 61:1-8
स्तोत्रसंहिता 61:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने. कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस. मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन. कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे. तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत. मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील. मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
स्तोत्रसंहिता 61:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे देवा, माझा धावा ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकूळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो; जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने. कारण तू माझा आश्रय, वैर्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस. तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन. (सेला) कारण, हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; तुझ्या नावाचे भय धरणार्यांचे वतन तू मला दिले आहेस; तू राजाला दीर्घायू कर; त्याच्या आयुष्याची वर्षें कैक पिढ्यांच्या वर्षांइतकी होवोत. तो देवासमोर चिरकाल राहो; तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील असे कर; म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहीन.