स्तोत्रसंहिता 56:1-13
स्तोत्रसंहिता 56:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो. माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत. मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन. मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील? दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात. ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात. त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण. तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का? मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे. मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील? हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन. कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.
स्तोत्रसंहिता 56:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे परमेश्वरा, मजवर दया करा, कारण शत्रू त्वेषाने माझा पाठलाग करीत आहे; दिवसभर निकराने ते माझ्यावर हल्ले करीतच असतात. माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत; माझ्यावर गर्वाने प्रहार करणारे अनेकजण आहेत. परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन. परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन. मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही. मर्त्य मानव माझे काय करणार? दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरीत अर्थ काढतात; माझा पाडाव कसा करावा, यासंबंधीचाच ते विचार करीत असतात. ते एकत्र जमून कट रचतात, दबा धरतात; माझ्या पावलांचा कानोसा घेत, मला ठार करण्याच्या संधीची वाट पाहतात. त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांना निसटून जाऊ देऊ नका; परमेश्वरा, आपल्या संतापाने त्या राष्ट्रांना पाडून टाका. तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत; तुम्ही माझे अश्रू तुमच्या कुपीमध्ये ठेवले आहेत; तुमच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत त्यांची नोंद नाही काय? ज्यावेळेस मी तुमचा मदतीसाठी धावा करेन. माझे शत्रू मागे फिरून पळ काढतील; त्यावरून हे प्रमाणित होणार की परमेश्वर माझ्या पक्षाचे आहेत. परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन, याहवेहमध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन— मी परमेश्वरावरच आपला भरवसा ठेवणार आणि मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार? माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला नवस केला आहे; मी तुम्हाला उपकारस्तुतीची अर्पणे करेन. कारण तुम्ही माझा जीव मृत्यूपासून सोडविला आहे आणि माझे पाय घसरण्यापासून सावरले आहेत; जेणेकरून मला परमेश्वरासमोर जीवनाच्या प्रकाशात चालता यावे.
स्तोत्रसंहिता 56:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे देवा, माझ्यावर दया कर, कारण माणसे मला तुडवत आहेत; दिवसभर माझ्याशी लढून त्यांनी माझा छळ मांडला आहे. दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत; मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन; देवावर मी भरवसा ठेवला आहे, मी भिणार नाही; मानव माझे काय करणार? दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपर्यास करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरुद्ध माझ्या वाइटासाठी असतात. ते एकत्र जमतात, ते टपून बसतात; ते माझ्या पावलांवर पाळत ठेवतात; ते माझा जीव घेण्यास पाहतात. इतकी त्यांची दुष्टाई असून ते सुटतील काय? हे देवा, राष्ट्रांना क्रोधाने खाली पाड. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत; माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन, परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरवसा ठेवला आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार? हे देवा, तुझ्या नवसांचे ऋण माझ्यावर आहे; मी तुला आभाररूपी अर्पणे वाहीन. कारण तू माझा जीव मरणापासून सोडवला आहेस; जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे म्हणून पतनापासून तू माझे पाय राखले नाहीत काय?