YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 56:1-13

स्तोत्र. 56:1-13 IRVMAR

हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो. माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत. मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन. मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील? दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात. ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात. त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण. तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का? मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे. मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील? हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन. कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.