स्तोत्रसंहिता 52:1-9
स्तोत्रसंहिता 52:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते. अरे कपटाने कार्य करणाऱ्या, तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते. तुला चांगल्यापेक्षा वाईटाची, आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे. तू कपटी जीभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात. त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील. नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील; ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील, पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले. पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; माझा देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे. कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत, त्यासाठी मी तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या समक्षेत सर्वकाळ तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे कारण ते चांगले आहे.
स्तोत्रसंहिता 52:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे. अरे कपट करणार्या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्यासारखी अनर्थाची योजना करते. तुला बर्यापेक्षा वाइटाची, सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे. (सेला) अगे कपटी जिभे, तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात; परंतु देव तुझा नाश करील; तो तुला धरून डेर्यातून खेचून काढील, व जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील. (सेला) नीतिमान हे पाहून भितील, व त्याला हसून म्हणतील, “पाहा, हाच तो पुरुष, ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरवसा ठेवला आणि हा दुष्कर्माने माजला.” मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे. हे तू घडवून आणले आहे म्हणून मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन; तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे.