स्तोत्रसंहिता 35:1-28
स्तोत्रसंहिता 35:1-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ. तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर. जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत. ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो. त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत. परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो. अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात. माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु:खी आहे. परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे. परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले. आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले. परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव. मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन. माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको. कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात. ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे. हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको. हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ. परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ. “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो. जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत. तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.
स्तोत्रसंहिता 35:1-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा; जे माझ्यासोबत युद्ध करतात, तुम्हीच त्यांच्याशी युद्ध करा. तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या; व उठून माझी मदत करा. माझ्यामागे येणार्या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.” जे मला ठार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांची तुम्ही धूळधाण करा; त्यांना मागे फिरवा आणि त्यांना लज्जित करा. वार्याने उडणार्या भुशाप्रमाणे, याहवेहचा दूत त्यांना उडवून लावो; त्यांच्यापुढील मार्ग हा अंधाराचा व निसरडा करा, याहवेहचा दूत त्यांचा पाठलाग करो. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आणि विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणला आहे. सर्वनाश अचानक त्यांच्यावर ओढवो— त्यांनी लावलेल्या सापळ्यात ते स्वतःच अडकोत व त्या खड्ड्यात पडोत व नष्ट होवोत. तेव्हा माझा जीव याहवेहमध्ये आनंद करेल आणि त्यांनी सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्षित होईल. माझे संपूर्ण अस्तित्व ओरडून म्हणेल, “याहवेह, तुमच्यासारखा कोण आहे? तुम्हीच दुबळ्यांची बलवान लोकांपासून आणि लुबाडणार्यांपासून गरीब आणि गरजवंतांची सुटका करता.” हे दुष्ट लोक शपथेवर खोटे बोलतात; ज्या गोष्टींची मला जाणीवही नाही, अशा गोष्टीचे आरोप ते मजवर करतात. ते माझ्या बर्याची फेड वाईटानेच करतात. माझा जीव शोकग्रस्त झाला आहे. ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला; नम्र होऊन मी त्यांच्यासाठी उपास केले. परंतु माझ्या प्रार्थना उत्तर न मिळताच माझ्याकडे परत आल्या. मी असा विलाप केला जणू काय मी माझ्या मित्रासाठी किंवा भावासाठी विलाप करीत आहे. मी असा शोक केला जसा मी माझ्या आईसाठी शोक करीत आहे. पण आता मी संकटात सापडलो असताना त्यांना आनंद होत आहे. माझ्यावर आक्रमण करणारे मला माहीत नसताना एकत्र येऊन, माझी एकसारखी निंदा करतात. ते नास्तिकाप्रमाणे माझी क्रौर्याने थट्टा करीत होते; माझ्यावर दातओठ खात होते. हे प्रभू, तुम्ही केव्हापर्यंत पाहत राहणार? त्यांच्या वाईट कृत्यापासून माझा बचाव करा, सिंहासारख्या या दुष्टांपासून माझे रक्षण करा. महासभेत मी तुमचे आभार व्यक्त करेल; मोठ्या मेळाव्यासमोर मी तुमची उपकारस्तुती करेन. जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत, त्यांना आता माझा उपहास करण्यात आनंद करू देऊ नका; निष्कारण जे माझे विरोधी झाले आहेत त्यांना डोळे मिचकाविण्याची संधी देऊ नका. ते शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी चर्चा न करता, शांतीने राहणार्या निरपराध लोकांविरुद्ध कट करण्यासंबंधी चर्चा करीत असतात. ते आपले तोंड उघडून माझ्याविरुद्ध ओरडून सांगतात, “अहाहा! अहाहा! आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे.” याहवेह, सत्य तुमच्या दृष्टीत आहे; तुम्ही शांत राहू नका; हे प्रभू, आता माझ्यापासून दूर राहू नका. हे माझ्या परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या सुरक्षेसाठी उठा, माझ्याकरिता युद्ध करा. याहवेह माझ्या परमेश्वरा आपल्या नीतिमत्तेने मला निर्दोष जाहीर करा; त्यांनी मजविरुद्ध आनंद करू नये. त्यांनी असे मनात बोलू नये, “हा हा हा! आम्हाला असेच हवे होते; आम्ही त्याला गिळून टाकले.” असे त्यांना बोलू देऊ नका. माझी संकटे पाहून आनंद करणार्यांना लज्जित आणि निराश करा; जे माझ्यापुढे प्रौढी मिरवितात, त्यांना लज्जित आणि अपमानित करा. परंतु माझे कल्याण व्हावे असे इच्छा करणार्या सर्वांना मोठा आनंद प्राप्त होऊ द्या; त्यांना आनंदाने ओरडू द्या, “आपल्या सेवकाला आनंदाने साहाय्य करणारे याहवेह किती थोर आहेत.” माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.
स्तोत्रसंहिता 35:1-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, मला विरोध करणार्यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्यांशी लढ. ढाल व कवच धारण कर, माझ्या साहाय्यासाठी उभा राहा. भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग. माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो. ते वार्याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो. त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो. कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली. त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो. मग माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्लास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील. माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्यापासून सोडवतोस;” द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारतात. मी केलेल्या बर्याची फेड ते वाइटाने करतात; माझा जीव निराधार झाला आहे. मी तर त्यांच्या आजारात गोणपाट नेसत असे; मी उपास करून आपल्या जिवाला क्लेश देत असे; माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्याच्याशी वागलो; आईसाठी शोक करणार्यासारखा सुतकी पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो. मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला; ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले; त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली. जेवणाला नावे ठेवणार्या अधर्म्यांप्रमाणे त्यांनी माझ्यावर दांतओठ खाल्ले. हे प्रभू, कोठवर पाहत राहशील? त्यांनी योजलेल्या अरिष्टापासून माझा जीव, तसाच तरुण सिंहापासून माझा प्राण सोडव. मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन. माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत; कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही; देशात शांततेने राहणार्यांविरुद्ध ते मसलती करतात. माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.” हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस. हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्यायनिवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून ऊठ, जागृत हो. हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत. “अहाहा! आमच्या मनासारखे झाले,” असे ते आपल्या मनात न म्हणोत; “आम्ही त्याला गिळून टाकले” असे ते न म्हणोत. माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत. माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत. माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.