स्तोत्रसंहिता 119:33-48
स्तोत्रसंहिता 119:33-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन. मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे. माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर. तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर. ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो. जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे. तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो. मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन. मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत. मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही. मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत. ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
स्तोत्रसंहिता 119:33-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे. माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे. तू आपले भय धरणार्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो; म्हणजे माझी निंदा करणार्याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही. मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन. आणि तुझ्या नियमांचे मनन करीन.