YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:33-48

स्तोत्रसंहिता 119:33-48 MARVBSI

हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे. माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे. तू आपले भय धरणार्‍यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो; म्हणजे माझी निंदा करणार्‍याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही. मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन. आणि तुझ्या नियमांचे मनन करीन.