YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 104:24-35

स्तोत्रसंहिता 104:24-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केलीस; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे. हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे, त्यात लहानमोठे असंख्य जलचर विहार करतात. पाहा, त्यात गलबते चालतात, त्यात क्रीडा करण्यासाठी तू निर्माण केलेला लिव्याथान1 तेथे आहे. तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाली देतोस म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात. जे तू त्यांना घालतोस ते ते घेतात; तू आपली मूठ उघडतोस तेव्हा उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते. तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात. तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात, व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो! तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा ती कापते; तो पर्वतांना स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतात. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन; मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो; परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल. पृथ्वीवरून पातकी नष्ट होवोत; ह्यापुढे दुर्जन न उरोत. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेशाचे स्तवन करा!1

स्तोत्रसंहिता 104:24-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत! ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत; पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे. त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे, त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत. तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे. योग्य वेळी तू त्यांना त्यांचे अन्न द्यावे म्हणून ते सर्व तुझ्याकडे पाहतात. जेव्हा तू त्यांना देतोस, ते जमा करतात; जेव्हा तू आपला हात उघडतोस तेव्हा त्यांची उत्तम पदार्थांनी तृप्ती होते. जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात; जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात. जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात, आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस. परमेश्वराचे वैभव सर्वकाळ राहो; परमेश्वरास आपल्या निर्मितीत आनंद होवो. तो पृथ्वीवर खाली बघतो आणि ती थरथर कापते; तो पर्वताला स्पर्श करतो आणि ते धुमसतात. मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन. माझे विचार त्यास गोड वाटो; परमेश्वराजवळ मला आनंद होईल. पृथ्वीवरून पापी नष्ट होवोत, आणि दुष्ट आणखी न उरोत. हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्रसंहिता 104:24-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे. एकीकडे प्रचंड व विस्तृत महासागर पसरलेला आहे; त्यात लहानमोठ्या अशा असंख्य प्राण्यांची रेलचेल आहे. यात जहाजांचे दळणवळण होत असते, आणि यात क्रीडा करण्यासाठी तुम्ही लिव्याथान निर्माण केला. निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी, प्रत्येक प्राणी आशेने तुमच्याकडे बघतो. जेव्हा तुम्ही त्यांना पुरविता, तेव्हा ते गोळा करतात; तुम्ही आपला हात पूर्णपणे उघडता आणि तुमच्या विपुल पुरवठ्याने ते तृप्त होतात. परंतु जेव्हा तुम्ही आपले मुख लपविता, तेव्हा ते व्याकूळ होतात; जेव्हा तुम्ही त्यांचा श्वास काढून घेता, तेव्हा ते मरतात व पुन्हा मातीत जाऊन मिसळतात. मग तुम्ही आपला आत्मा पाठविता, तेव्हा ते अस्तित्वात येतात, आणि पृथ्वीला पुन्हा नवे स्वरूप आणता. याहवेहचे वैभव सर्वकाळ राहो; याहवेहला आपल्या कृतीपासून आनंद होवो— त्यांच्या नेत्रकटाक्षांनी पृथ्वी थरथर कापते; ते स्पर्श करताच पर्वतातून धुराचे लोट बाहेर पडतात. मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन; माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या परमेश्वराचे स्तुतिगान करेन. माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो, कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे. सर्व पातकी पृथ्वीवरून नष्ट होवोत; दुष्ट परत न दिसोत.