YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 104:1-23

स्तोत्रसंहिता 104:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस; तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस. जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस; तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस. तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो; तू मेघांना आपले रथ करतोस; तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस. तू वाऱ्याला आपले दूत करतोस, अग्नीच्या ज्वालांस आपले सेवक करतोस त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे, आणि ती कधीही हलणार नाही. तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस; पाण्याने पर्वत झाकले आहेत. तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे; तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली. ती पर्वतावरून जाऊन खाली दरितून वाहात गेली, त्यांच्यासाठी नेमलेल्या जागी ती जाऊन राहिली. तू त्यांना घालून दिलेल्या मर्यादा त्यांना ओलांडता येत नाही; ते पृथ्वीला पुन्हा झाकून टाकणार नाहीत. तो दऱ्यातून झरे वाहवितो; डोंगरामधून प्रवाह वाहत जातात. ते रानातल्या सर्व पशूंना पाणी पुरवितात; रानगाढवे आपली तहान भागवितात. नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात; ते फांद्यामध्ये बसून गातात. तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो. पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे. तो गुरांढोरासाठी गवत उगवतो, आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो; यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे. तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षरस, त्याचा चेहरा चमकविणारे तेल, आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी. परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत; तेथे पक्षी आपली घरटी बांधतात. करकोचा देवदारूचे झाड तिचे घर करतो. रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात; खडक सशांचे आश्रयस्थान आहे. त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे; सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते. तू रात्रीला काळोख करतोस, तेव्हा जंगलातील सर्व जनावरे बाहेर येतात. तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि देवाकडे आपले अन्न मागतात. जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा ते परत जातात, आणि आपल्या गुहेत झोपतात. दरम्यान लोक आपल्या कामासाठी बाहेर जातात, आणि ते संध्याकाळपर्यंत कष्ट करतात.

स्तोत्रसंहिता 104:1-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात; तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात. तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे; अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे, आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे. मेघ त्यांचे रथ आहेत; ते वार्‍याच्या पंखावर आरूढ होऊन जातात. ते वायूला आपले दूत; व अग्निज्वालांना आपले सेवक करतात. तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे, जे कधीही ढळणार नाही. तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले; जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले. परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले, तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले; ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्‍याखोर्‍यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले. तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली; जेणेकरून त्यांनी पृथ्वी पुन्हा कधीही व्यापून टाकू नये. त्यांनी खोर्‍यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले. ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात; त्या ठिकाणी रानगाढवेही आपली तहान भागवितात. आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात; व वृक्षांच्या फांद्यांवरून गाणी गातात. ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात; पृथ्वी त्यांच्या फलवंत कार्याने समाधान पावते. ते जनावरांच्या पोषणाकरिता गवत उत्पन्न करतात, आणि मानवाने मशागत करावी— जमिनीतून अन्न उत्पादन करावे म्हणून: मानवाचे हृदय उल्हासित करण्यास द्राक्षारस, त्याचे मुख तुळतुळीत राखण्यासाठी तेल आणि त्याच्या हृदयाचे जतन व्हावे म्हणून भाकर उत्पन्न करतात. याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो. त्यावर पक्षी आपली घरटी करतात व करकोचा त्याचे घरटे देवदारू वृक्षावर बांधतो. उंच पर्वत रानबकर्‍यांचे निवासस्थान आहेत, खडकांमध्ये डोंगरी ससे सुरक्षित बिळे करतात. त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली, आणि सूर्यास कधी अस्त व्हावे हे ठाऊक आहे. ते अंधार पाठवितात आणि रात्र होते, तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात. सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात. सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात, व शांतपणे झोपतात. मग लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात, व सायंकाळपर्यंत परिश्रम करतात.

स्तोत्रसंहिता 104:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस; तू मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस. तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस; कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस; आपल्या माड्यांच्या तुळया जलांच्या ठायी बसवतोस, मेघांना आपला रथ करतोस, वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस, वायूंना आपले दूत करतोस, अग्नी व ज्वाला ह्यांना आपले सेवक करतोस. तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादलेस, पर्वतांवर जले स्थिर राहिली; तुझ्या धमकीने ती पळाली, तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली; ती पर्वतांवरून जाऊन खाली खोर्‍यांतून वाहिली, त्यांच्यासाठी तू नेमलेल्या स्थळी ती जाऊन राहिली. तू ठरवलेल्या मर्यादेचे त्यांना उल्लंघन करता येत नाही; भूमी झाकायला त्यांना परत येववत नाही. तो खोर्‍यांतून झरे काढतो; ते डोंगरांमधून वाहतात; ते सर्व वनपशूंना प्यायला पाणी पुरवतात; त्यांवर रानगाढवे आपली तहान भागवतात. त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात; ते वृक्षांच्या फांद्यांवरून गातात. तो आपल्या माड्यांवरून पर्वतांवर जलसिंचन करतो; तुझ्या कृतींच्या फळाने भूमी तृप्त होते. तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगववतो; ह्यासाठी की, मनुष्याने भूमीतून अन्न उत्पन्न करावे; म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी. परमेश्वराचे वृक्ष, लबानोनावर त्याने लावलेले गंधसरू, रसभरित असतात; त्यांवर पक्षी आपली घरटी बांधतात; करकोचाचे घर देवदारूंमध्ये असते. उंच पर्वत रानबकर्‍यांसाठी आहेत; खडक सशांचे आश्रयस्थान आहेत. त्याने कालमान समजण्यासाठी चंद्र नेमला; सूर्य आपला अस्तसमय समजून घेतो. तू अंधार करतोस तेव्हा रात्र होते; तिच्यात सर्व जातींचे वनपशू संचार करतात; तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात, देवाजवळ आपले अन्न मागतात. सूर्य उगवतो तेव्हा ते परत जाऊन आपापल्या गुहांत निजून राहतात. मनुष्य आपल्या कामधंद्यास जाऊन संध्याकाळपर्यंत श्रम करतो.