YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 7:7-23

नीतिसूत्रे 7:7-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता. तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे, त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला. आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते. ती वाचाळ व स्वच्छंदी असून, तिचे पाय घरी राहत नाही; कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते. मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली; निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली, “आज मी माझी शांत्यर्पणे केली; मी आपले नवस फेडले, ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस. मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे. मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे. ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ. माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे. त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे; तो पौर्णिमेच्या दिवशी परत घरी येईल.” तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले; आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली. तो तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो, जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो, तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही, किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 7 वाचा

नीतिसूत्रे 7:7-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला. तो तिच्या घराच्या कोपर्‍याजवळून जाणार्‍या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने संध्याकाळी दिवस मावळता, रात्रीच्या काळोखात, निबिड अंधकारात गेला. तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणीएक कावेबाज स्त्री त्याला भेटली. ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत; कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते. तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले; तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले, “मला शांत्यर्पणे करायची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले. ह्यासाठी तुला भेटायला व तुझे मुख पाहायला, मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस. मी आपला पलंग वेलबुट्टीदार गिरद्यांनी, मिसरी तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजवला आहे. मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, ह्यांनी सुवासिक केली आहे. ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू. कारण घरधनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेला आहे; त्याने पैशांची पिशवी बरोबर नेली आहे; तो पौर्णिमेस घरी येईल.” तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले. तो तत्काळ तिच्यामागे चालला, जसा बैल कापला जाण्यास जातो, तसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो. जसा पक्षी, पाश आपला जीव घेण्यासाठी आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो; पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जातो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 7 वाचा