YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 31:10-24

नीतिसूत्रे 31:10-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही. ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही. ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते. ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते. रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते. ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते. ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही. ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते. ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते. ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते. तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात. ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचा

नीतिसूत्रे 31:10-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे. तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो, आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही. आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते, त्याचे अहित करीत नाही. ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते. ती एका व्यापारी जहाजासारखी आहे, तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते. ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते. ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते. ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत. तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते, आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही. ती तिच्या हातांमध्‍ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते. ती गरिबांना उदारहस्ते देते आणि गरजूंना सढळ हाताने देते. हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते; कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात. ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते; ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते. तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो, जिथे तो देशातील पुढार्‍यांबरोबर बसतो. ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापार्‍यांना कमरबंद पुरविते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचा

नीतिसूत्रे 31:10-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सद्‍गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते; त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही. ती लोकर व ताग खटपटीने मिळवते, आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती आपली अन्नसामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते, आणि आपल्या दासींना त्यांचा अन्नाचा वाटा देते. शेताची चौकशी करून ते ती विकत घेते; ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते. ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते; ती आपले बाहू नेटाने कामाला लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. ती चाती आपल्या हाती घेते, ती हातांनी चरकी धरते. ती गरिबांसाठी मूठ उघडते, गरजवंतांना हात देते. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही; कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करते, तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या वडीलमंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापार्‍यांना कमरबंद विकत देते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचा