YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 31

31
राजाला ताडन
1लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी :
2माझ्या मुला, मी काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी काय सांगू?
3तू आपले वीर्य स्त्रियांना देऊ नकोस; आपले मन राजांचा नाश करणार्‍यांना वश होऊ देऊ नकोस.
4हे लमुएला, द्राक्षारस पिणे राजांना शोभत नाही, राजांना ते नाही शोभत; मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारांना शोभत नाही.
5ते मद्य प्याले तर नियमशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करतील.
6मरणाच्या लागास आलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे.
7त्याने ते पिऊन आपली विपत्ती विसरावी, त्याच्या हालांचे त्याला विस्मरण व्हावे.
8मुक्यांच्या वतीने, आसन्नमरण झालेल्यांच्या वतीने आपले तोंड उघड.
9आपले मुख उघड, नीतिमत्त्वाने न्याय कर; गरीब व कंगाल ह्यांना न्याय मिळू दे.
सद्‍गुणी स्त्री
10सद्‍गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे.
11तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते; त्याला संपत्तीची वाण पडत नाही.
12ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही.
13ती लोकर व ताग खटपटीने मिळवते, आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते.
14ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती आपली अन्नसामग्री दुरून आणते.
15रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते, आणि आपल्या दासींना त्यांचा अन्नाचा वाटा देते.
16शेताची चौकशी करून ते ती विकत घेते; ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते.
17ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते; ती आपले बाहू नेटाने कामाला लावते.
18आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही.
19ती चाती आपल्या हाती घेते, ती हातांनी चरकी धरते.
20ती गरिबांसाठी मूठ उघडते, गरजवंतांना हात देते.
21आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही; कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते.
22ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करते, तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे.
23तिचा पती वेशीत देशाच्या वडीलमंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो.
24ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापार्‍यांना कमरबंद विकत देते.
25बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्‍चिंत राहते.
26तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते,
27ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही.
28तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो :
29“बहुत स्त्रियांनी सद्‍गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.”
30सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्‍या स्त्रीची प्रशंसा होते.
31तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.

सध्या निवडलेले:

नीतिसूत्रे 31: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन