नीतिसूत्रे 31:1-9
नीतिसूत्रे 31:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी : माझ्या मुला, मी काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी काय सांगू? तू आपले वीर्य स्त्रियांना देऊ नकोस; आपले मन राजांचा नाश करणार्यांना वश होऊ देऊ नकोस. हे लमुएला, द्राक्षारस पिणे राजांना शोभत नाही, राजांना ते नाही शोभत; मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारांना शोभत नाही. ते मद्य प्याले तर नियमशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करतील. मरणाच्या लागास आलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे. त्याने ते पिऊन आपली विपत्ती विसरावी, त्याच्या हालांचे त्याला विस्मरण व्हावे. मुक्यांच्या वतीने, आसन्नमरण झालेल्यांच्या वतीने आपले तोंड उघड. आपले मुख उघड, नीतिमत्त्वाने न्याय कर; गरीब व कंगाल ह्यांना न्याय मिळू दे.
नीतिसूत्रे 31:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला? तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको. हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही. ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील. जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे. त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे. जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड. तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.
नीतिसूत्रे 31:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत. माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक! माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक! तुझी शक्ती स्त्रियांच्या सहवासात घालवू नको. जे राजांचा नाश करतात, त्यांच्यासाठी तुझे बळ घालवू नको. हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही. असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे. ज्यांचा नाश होत आहे त्यांना मदिरा पिऊ द्या, जे यातनेमध्ये आहेत त्यांना मद्य पिऊ द्या! त्यांना पिऊ द्या आणि त्यांचे दारिद्र्य विसरू द्या, आणि त्यांच्या क्लेशाचे विस्मरण होऊ द्या. जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल, जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल. गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे; त्यांच्यासाठी बोल आणि त्यांना निष्पक्ष न्याय मिळवून दे.