नीतिसूत्रे 21:1-16
नीतिसूत्रे 21:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; तो त्यास वाटेल तेथे वळवतो. प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात, परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो. योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा परमेश्वरास अधिक मान्य आहेत. घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात. परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो. लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते. दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात. अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो. भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले. दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो; त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही. जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात; आणि जेव्हा सुज्ञास शिक्षण मिळते तेव्हा त्याच्या ज्ञानात वाढ होते. नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो, तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो. जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही. गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते, आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते. योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो. जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो, त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल.
नीतिसूत्रे 21:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे, जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात. माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत, परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात. अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो. गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण— दुष्टांचे नांगर न चालविलेले शेत—पाप उत्पन्न करतात. कष्ट करणार्यांच्या योजना भरभराटीस येतात, पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल. लबाड बोलून मिळवलेली संपत्ती, म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे. दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल, कारण चांगले करण्यास ते नकार देतात. दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे, परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते. भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्यात राहणे बरे. दुष्ट माणसे वाईटाची इच्छा धरतात; आणि त्यांच्या शेजार्यांवर ते कधीही दया करीत नाहीत. जेव्हा टवाळखोरांना शिक्षा होते, ते बघून साधाभोळा मनुष्य शहाणा होतो; शहाण्या माणसांचे ऐकून ते ज्ञान मिळवितात. नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात आणि त्या दुष्टाची दुष्टता त्याचा नाश करतात. जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही. गुप्तपणे दिलेले बक्षीस राग शांत करते; झग्यात लपवून दिलेला उपहार तीव्र क्रोध शांत करते. जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो. पण दुष्ट कृत्ये करणार्यांना ते प्राणसंकटच वाटते. शहाणपणाचा मार्ग सोडून दूर जाणारा मनुष्य मृतांच्या मंडळीत विश्रांतीसाठी येतो.
नीतिसूत्रे 21:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे. चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंत:करण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत. उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात. दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात. अपराधांचा भार वाहणार्याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते. भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या एका कोपर्याला बसणे पुरवले. दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजार्यावर तो कृपादृष्टी करीत नाही. निंदकाला शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो; सुज्ञास शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञान पावतो. न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तींत पाडतो. गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही. एकान्ती दिलेली देणगी राग शमवते, पदरात झाकलेली लाच तीव्र कोप शमवते. न्याय झाल्याने नीतिमानाला आनंद होतो, पण दुष्कर्म करणार्यांचा त्यामुळे नाश होतो. ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल.