नीतिसूत्रे 21:1-16
राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे. चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंत:करण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत. उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात. दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात. अपराधांचा भार वाहणार्याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते. भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या एका कोपर्याला बसणे पुरवले. दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजार्यावर तो कृपादृष्टी करीत नाही. निंदकाला शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो; सुज्ञास शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञान पावतो. न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तींत पाडतो. गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही. एकान्ती दिलेली देणगी राग शमवते, पदरात झाकलेली लाच तीव्र कोप शमवते. न्याय झाल्याने नीतिमानाला आनंद होतो, पण दुष्कर्म करणार्यांचा त्यामुळे नाश होतो. ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल.
नीतिसूत्रे 21:1-16