YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 20:1-15

नीतिसूत्रे 20:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. राजाचा दरारा सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, त्याला जो राग आणतो तो आपल्या जिवाविरुद्ध पाप करतो. भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो. हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही; म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही. मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो. दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो? जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात. राजा न्यायासनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो. “मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल? वजनावजनांत व मापामापांत फरक असणे ह्या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे. वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते. ऐकणारे कान व पाहणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वराने केले. निद्राप्रिय होऊ नकोस, झालास तर भिकेला लागशील; आपले नेत्र उघड म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल. “हे पसंत नाही, ते पसंत नाही,” असे विकत घेणारा म्हणतो, मग तेथून गेल्यावर बढाई मारतो. सोने आहे व मोतीही विपुल आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे.

सामायिक करा
नीतिसूत्रे 20 वाचा

नीतिसूत्रे 20:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही. राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो. जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो. आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही. मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो. बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते. जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात. जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो. मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल? भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे. तरुणसुध्दा आपल्या कृतीने आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो. ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत. झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल. विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो. तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत.

सामायिक करा
नीतिसूत्रे 20 वाचा

नीतिसूत्रे 20:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत. राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे; जो त्याचा राग जागृत करतो त्याची प्राणहानी होते. कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो. आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत; म्हणून हंगामाच्या वेळी शोधून त्यांना काहीही मिळणार नाही. मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो. पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल? नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो; त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात. जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो तेव्हा तो त्याच्या नजरेने सर्व वाईट पाखडून दूर करतो. “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल? वजनावजनांत व मापामापांत फरक असणे— या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे. अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत ते त्यांच्या कृत्यांवरून ओळखली जात नाहीत काय? पाहणारे डोळे व ऐकणारे कान— दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे. तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील; जागा राहा आणि तुझ्याकडे विपुल खाद्य शिल्लक राहील. खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!” नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो. सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत, परंतु शहाणपणाचे शब्द बोलणारे ओठ दुर्मिळ रत्न आहे.

सामायिक करा
नीतिसूत्रे 20 वाचा