नीतिसूत्रे 2:12-20
नीतिसूत्रे 2:12-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील, ते चांगले मार्ग सोडून, अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत. जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात, आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात. ते वाकडे मार्ग अनुसरतात, आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात. ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते. तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे, आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे. कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात. जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही. म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे, व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे.
नीतिसूत्रे 2:12-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्या माणसांपासून दूर ठेवील. ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत, ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात, ज्यांचे मार्ग विकृत आहेत आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत! सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्या स्त्रीपासून, जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे. निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात. तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही. यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील, आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील.
नीतिसूत्रे 2:12-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील; ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात; त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्लास पावतात; त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत. परस्त्रीपासून, मोहक भाषण करणार्या परस्त्रीपासून, ज्ञान तुझा बचाव करील; तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे; तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे, तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात; जे तिच्याकडे जातात त्यांच्यातून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत; ह्यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व नीतिमानांच्या रीतीचे अवलंबन करावे.