नीतिसूत्रे 17:15-28
नीतिसूत्रे 17:15-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा, ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो. मूर्खाला बुद्धी नसता ज्ञानाची खरेदी करण्यासाठी तो हाती द्रव्य का घेतो? मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजार्यासमक्ष, हातावर हात मारून जामीन होतो. जो कलहप्रिय तो अपराधप्रिय असतो; जो आपले दार उंच करतो तो नाशाला आमंत्रण देतो. ज्याचे चित्त उन्मत्त असते त्याचे कल्याण होत नाही; ज्याची जिव्हा कुटिल असते तो विपत्तीत पडतो. मूर्खाला जन्म देतो तो दु:खाची जोड करतो; मूर्खाच्या बापाला आनंद नाही. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय; खिन्न हृदय हाडे शुष्क करते. न्यायमार्ग विपरीत करण्यासाठी, दुर्जन गुप्तपणे लाच घेतो. जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटांकडे असतात. मूर्ख मुलगा आपल्या बापाला दु:ख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो. नीतिमानास दंड करणे व सरदारांना त्यांच्या सरळतेस्तव ताडन करणे योग्य नाही. जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. मौन धारण करणार्या मूर्खालाही शहाणा समजतात; तो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात.
नीतिसूत्रे 17:15-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी दुष्टाला निर्दोष ठरवतो किंवा नीतिमानाला दोषी ठरवतो, या दोन्ही लोकांचा परमेश्वरास तिटकारा आहे. मूर्खाला बुद्धी नसताना तो ज्ञानाविषयी शिक्षण घेण्यासाठी पैसा का देतो, जेव्हा त्याची ते शिकण्याची क्षमता नाही? मित्र सर्व वेळी प्रीती करतो, आणि भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे. बुद्धिहीन मनुष्य वचनानी बांधला जातो, आणि त्याच्या शेजाऱ्याच्या कर्जाला जबाबदार होतो. ज्याला भांडण प्रिय त्यास पाप प्रिय; जो आपले दार उंच करतो तो हाड मोडण्यास कारण होतो. ज्या मनुष्याचे हृदय कपटी असते त्यामध्ये काही चांगले सापडत नाही, ज्या कोणाची जीभ वक्र असते तो संकटात पडतो. जो कोणी मूर्खाला जन्म देतो, तो स्वतःवर दुःख आणतो; जो कोणी मूर्खाचा पिता असतो त्यास आनंद नाही. आनंदी हृदय हे चांगले औषध आहे. पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो. न्यायाच्या मार्गाचा दुरुपयोग करण्यासाठी, वाईट मनुष्य गुप्तपणे लाच स्वीकारतो, ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात. मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे, आणि जिने त्यास जन्म दिला त्या स्त्रीला क्लेश असा आहे. नीतिमानाला शिक्षा करणे हे कधीही चांगले नाही; किंवा प्रामाणिक अधिपतीस त्याच्या सरळपणामुळे मारणे चांगले नाही. जो कोणी मितभाषण करतो त्याच्याकडे ज्ञान असते, आणि ज्याची वृत्ती शांत तो समजदार असतो. मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात; जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात.
नीतिसूत्रे 17:15-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे— अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात. जर ते समजू शकत नाहीत तर ज्ञानवर्धनासाठी मूर्खाच्या हातात पैसे का असावेत? खरा मित्र नेहमीच प्रेम करतो; आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो. जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्याच्या कर्जफेडीची हमी घेतो, तो विवेकहीन मनुष्य आहे. जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो. ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही; ज्याची जीभ विकृत भाषण करते, तो संकटात पडतो. जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो, आणि देवहीन मूर्खाच्या पालकांना आनंद मिळत नाही. आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, पण खिन्न मन हाडे शुष्क करते. न्यायाचे पारडे फिरविण्यासाठी, दुष्ट मनुष्य गुप्त रीतीने लाच घेतो. समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते, पण मूर्खाची नजर पृथ्वीच्या शेवटपर्यंत सैरभैर फिरत असते. मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो. निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे, तसेच प्रामाणिक अधिपतींना शिक्षा करणे हे निश्चितच चुकीचे आहे. ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो. जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.